समलैंगिकतेविषयी जान्हवी कपूर असं काही म्हणाली की...

 सर्वाधिक लक्षवेधी विषय ठरला तो म्हणजे समलैंगिकतेचा.   

Updated: Jul 4, 2019, 09:03 AM IST
समलैंगिकतेविषयी जान्हवी कपूर असं काही म्हणाली की...  title=

मुंबई : हिंदी कलाविश्वात आजवर काळानुरुप बरेच बदल झाले आहेत. मग ते कलाकारांमधील बदल असो, चित्रपटांच्या कथानकातील बदल असो किंवा ते कथानक मांडण्याच्या पद्धतीत झालेला बदल असो. बदलांचं हेच सत्र काही संवेदनशील आणि तितकेच महत्त्वाचे विषय हाताळण्याच्या बाबतीतही पाहता आलं. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी विषय ठरला तो म्हणजे समलैंगिकतेचा. 

समलैंगिंक संबंधांच्या मुद्दयावर काही वर्षांपूर्वी खुलेपणाने बोलण्याचं अनेकांना संकोचलेपणा वाटत होता. किंबहुना समाजात असेही काही घटक अस्तित्वात आहेत, ही बाबच मुळात अस्वीकारार्ह होती. पण, आता मात्र चित्र बऱ्याच अंशी बदललं आहे. यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे ती म्हणजे चित्रपट विश्वाने. 

आजवर अनेक चित्रपटांमध्ये कथानकाची गरज पाहता मोठ्या कलात्मक आणि प्रभावीपणे समलैंगिक संबंधांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 'धडक' फेम अभिनेत्री जान्हवी कपूर हिनेही या मुद्यावर आपलं मत मांडलं आहे. 

'दोस्ताना २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज असणाऱ्या जान्हवीने 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत याविषयीचं वक्तव्य केलं. 'दोस्ताना २' या चित्रपटाचा भाग झाल्याचा आनंद तिने यावेळी व्यक्त केला. 'या चित्रपटाचा भाग होता आलं, यासाठी मी फारच उत्सुक आहे. चित्रपटातून जो विषय हाताळला जाणार आहे, फक्त त्यासाठीच नव्हे तर चित्रपटाचं कथानही तितकंच रंजक आहे. आपण या (समलैंगिक संबंधांच्या) मुद्द्यावर खुलेपणाने बोलत आहोत आणि या गोष्टींना अधिक सहज करत आहोत याचा मला आनंद आहे', असं जान्हवी म्हणाली. 

समलैंगिक संबंधांप्रती असणारी साकात्मक भूमिका पाहून या साऱ्या बदलाचं जान्हवीने कौतुक केलं. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दोस्ताना' या चित्रपटातून समलैंगिंक संबंधांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. ज्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. त्याच्याच सिक्वलची तयारी 'धर्मा प्रो़डक्शन्स' या निर्मिती संस्थेअंतर्गत सुरु आहे. 'दोस्ताना २'साठी जान्हवीसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यन याची वर्णी लागली आहे. पण, चित्रपटातील तिसरा चेहरा कोण याविषयीची उत्सुकता मात्र कायम आहे.