मुंबई : हिंदी कलाविश्वात सध्याच्या घडीला बहुचर्चित सेलिब्रिटी जोड्यांची नावं घ्यायची म्हटलं तर काही नावं लगेचच समोर येतात. रणबीर- आलिया असो किंवा मग वरुण- नताशा असो. नावांच्या या यादीत अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्याही नात्याचा समोवश होतो. दिशा आणि टायगर गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.
विविध पुरस्कार सोहळे, लग्नसमारंभ, सेलिब्रिटी पार्टी, एखाद्या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग या कार्यक्रमांना दिशा आणि टायगर या दोघांचीही एकत्रित उपस्थिती बरंच काही सांगून जाते. पण, अद्यापही त्यांनी मात्र या नात्याविषयी फार काही स्पष्ट केलेलं नाही. एकिकडे 'खुल्लम् खुल्ला प्यार करेंगे हम दोनो', या तत्वावर नात्याला नव्या वळणावर नेणारी ही जोडी दुसरीकडे मात्र त्यांच्या याच नात्याविषयी खुलेपेणाने माध्यमांसमोर स्वीकृती देत का नाही, हाच अनेकांचा प्रश्न. याच प्रश्नाचं उत्तर दिशा पटानीने दिलं.
'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत तिला याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. 'तुम्ही दोघंही या नात्याचा स्वीकार का करत नाही? चाहत्यांना तुमची जोडी फार आवडते', या चाहत्यांच्या प्रश्नावर दिशाने मोठ्आ आत्मविश्वासाने उत्तर दिलं.
''मी खुप आधीपासून प्रयत्न करत आहे. किंबहुना त्याच्यावर प्रभाव पाडण्यासाठी मी फार प्रयत्न करत आहे. आता 'भारत' या चित्रपटातही मी काही स्टंट केले आहेत, जेणेकरुन त्याच्यावर प्रभाव पाडू शकेन. पण, यातही नशिबाची साथ नाही'', असं म्हणत आपण, एकत्र खाण्यासाठी वगैरे बाहेर जातो याचा अर्थ असा नव्हे की तो माझ्यापासून प्रभावित आहे हे दिशाने स्पष्ट केलं. तुम्ही त्याच्याशीच बोला, असं म्हणत तो आणि मी आम्ही दोघंही लाजऱ्या स्वभावाचे असल्यामुळे कोणीच याविषयी पुढाकार घेत नाही, ही बाब तिने सर्वासमोर ठेवली. त्यामुळे आता त्यांच्या या नात्याला पुढे नेमकं कोणतं वळण मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.