मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ही सेलिब्रिटी जोडी नुकतीच जोधपूरला जाऊन आली. निमित्त होतं ते म्हणजे रणबीरचा वाढदिवस. मंगळवारी सुजान जवाई रिसॉर्टमध्ये तलाव, डोंगररांगा आणि निसर्गाच्या अगाध लीलांचा आस्वाद घेत धकाधकीच्या आणि सततच्या व्यग्र वेळापत्रकातून स्वत:साठी आणि त्यांच्या नात्यासाठी काही खास क्षण दिले. (Bollywood actress Alia Bhatt And Ranbir Kapoors Romantic Date On laters Birthday jodhpur)
रणबीर आणि आलिया या दोघांच्याही प्रेमाला यावेळी उधाण आल्याचं पाहायला मिळालं. कोणत्याही कृत्रिम वातावरणाला प्राधान्य न देता त्यांनी एखाद्या सहलीप्रमाणेच या खास क्षणांना आपलंसं केलं. त्यांच्या या रोमँटिक डेटमधील फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
एका फोटोमध्ये आलिया पांढऱ्या रंगाच्या टी -ट्राउझर्समध्ये सुरेख दिसत आहे. ती रणबीर कपूरच्या शेजारी पिकनिक मॅटवर बसल्याचं इथं पाहायला मिळत आहे. दुसऱ्या एका चित्रात, आलिया रणबीरच्या शेजारी झोपलेल्या चटईवर उभी असून त्याला काहीतरी देताना दिसत आहे.
माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चांनुसार आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न आतापर्यंत झालं असतं, पण कोरोनाच्या संकटानं सारी गणितं बदलली. सूत्रांच्या माहितीनुसार ही जोडी जोधपूरमधीलच एखाद्या ठिकाणाला लग्नासाठी पसंती देऊ शकते.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी 2018 मध्ये डेटिंग सुरु केलं. 2019 मध्ये ते पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आले. येत्या काळात ही जोडी काही चित्रपटांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.