सुशांतचे आत्महत्येपूर्वीचे १२ तास आणि 'ते' ४ फोन क़ॉल

.... पण, तिच्याशी त्याचं बोलणं होऊ शकलं नाही

Updated: Jun 15, 2020, 03:35 PM IST
सुशांतचे आत्महत्येपूर्वीचे १२ तास आणि 'ते' ४ फोन क़ॉल title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आत्महत्या केली आणि आयुष्यच संपवून टाकण्याच्या त्याच्या या निर्णयानं सारं कलाविश्व आणि चाहत्यांचं वर्तुळ हादरलं. हा हादरा सहजासहजी विसरता येण्याजोगा नव्हता. सुशांत इतक्या टोकाच्या निर्णयावर पोहोचण्यापूर्वी त्यानं काही व्यक्तींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. सुशांतच्या जीवनातील ते शेवटचे १२ तास अतिशय महत्त्वाचे ठरले.

आत्महत्येच्या आधीच्या रात्री जवळपास १ वाजून ४७ मिनिटांनी सुशांतनं रिया चक्रवर्तीला फोन केला होता. पण, तिच्याशी त्याचं बोलणं होऊ शकलं नाही. ज्यानंतर त्यानं १ वाजून ५१ मिनिटांनी आपला अभिनेता मित्र महेश शेट्टी याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्याशीही सुशांतचं बोलणं होऊ शकलं नाही. 

सुशांत त्यानंतर नेमका कधी झोपला हे कुणालाच ठाऊक नव्हतं. सकाळी सुशांतचे मिस कॉल पाहून ज्यावेळी महेशनं सुशांतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं फोन उचलला नाही. पोलिसांच्या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार सुशांतनं आपल्याला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला. पण, फोन काही लागू शकला नव्हता असं महेशला कळलं. 

वाचा : माझ्या वडीलांची काळजी घ्या, ३ दिवसाआधी सुशांतचे फोनवर संभाषण

 

सकाळी ब्रेकफास्टवेळी त्यानं ज्युस घेतला. ज्यानंतर १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचं आहे हे विचारण्यासाठी म्हणून सुशांतच्या आचाऱ्यानं त्याच्या बेडरुमचं दार ठोठावलं. त्यावेळी नीरज या आचाऱ्यासोबतच आणखी एक आचारी केशव, हाउसकिपिंग स्टाफ दीपेश सावंत आणि सिद्धार्थ पिथानी सुशांतच्या घरी हजर होते. 

सिद्धार्थ अकरा वाजण्याच्या सुमारास उठला आणि त्यानं साडेअकराच्या सुमारास सुशांतच्या खोलीचं दार ठोठावलं. शेवटी सिद्धार्थनं सुशांतला फोन केला. त्याच्या खोलीतून फोनचा आवाजही येत होता. त्यानं फोन न उचलल्यामुळं अखेर सुशांतच्या बहिणीला म्हणजेच रितूला तेथे बोलवण्यात आलं. 

वाचा : या दोघांनी उचलला नव्हता सुशांतचा शेवटचा कॉल, पोलीस करणार चौकशी

 

रितू येऊपर्यंत केअर टेकर फ्रान्सिस यानं चावीवाल्याला बोलवून खोलीचं दार उघडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, रितूनं साऱ्या प्रकरणाची माहिती आपल्या पतीला दिली. जे हरियाणामध्ये एक अधिकारी आहेत. त्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फोन करत या प्रकरणाची माहिती दिली. तोवर इथं प्रसंग बिकट होत चालला होता. जवळपास १२ वाजून २५ मिनिटांनी दरवाजा उघडताच सुशांत पंख्याला गळफास लावून घेतल्या अवस्थेत आढळला. पुढं तिघांनी मिळून सुशांतला खाली उतरवलं, डॉक्टरांनाही तातडीनं बोलवण्यात आलं. ज्यांनी सुशांतला मृत घोषित केलं.