'बाला'ला पायरसीचा फटका; चित्रपट ऑनलाइन लीक

'बाला'ला प्रेक्षकांची चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे.

Updated: Nov 9, 2019, 07:43 PM IST
'बाला'ला पायरसीचा फटका; चित्रपट ऑनलाइन लीक title=

मुंबई : अनेक वाद आणि आरोपांनंतर बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा 'बाला' चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर प्रेक्षकांची चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'बाला' चित्रपटाने पहिल्या दिवशी १० कोटीहून जास्त रुपयांची कमाई केली आहे. पण या कमाईच्या आकड्यांवर आता लगाम लागण्याची शक्यता आहे. कारण, प्रदर्शनाच्या काही वेळात 'बाला' ऑनलाईन लीक झाला आहे.

'बाला' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची मोठी चर्चा होती. मात्र प्रदर्शनानंतर आता इतर चित्रपटांप्रमाणेच 'बाला'लाही पायरसीचा फटका बसला आहे. 'बॉलिवूड लाइफ डॉट कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, बाला चित्रपट ऑनलाइन लीक झाला असून तो बेकायदेशीरपणे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याचं समोर आलं आहे. चित्रपट ऑनलाइन लीक करण्यात पुन्हा एकदा कुख्यात पायरसी वेबसाइट तमिलरॉकर्सचं नाव पुढे आलं आहे.

चित्रपट बनवताना एका चित्रपटामागे अनेक लोकांची मेहनत असते. चित्रपट बनवताना कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. अशातच चित्रपट प्रदर्शनाच्या काही वेळातच तो लिक होणं हे चित्रपट निर्मात्यांसाठी मोठं नुकसानकारक ठरत आहे. चित्रपट लिक झाल्याचा थेट परिणाम त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसून येतो. 

केवळ 'बाला'च नाही तर याआधीदेखील तमिलरॉकर्सने अनेक बीग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही वेळातच लीक केले आहेत.  'हाउसफुल ४', 'मेड इन चाइना', 'सांड की आंख' या चित्रपटांनाही पायरसीचा फटका बसला आहे.

तमिलरॉकर्सविरोधात बरेच मोठे निर्माते, दिग्दर्शक तक्रार करत असून हा मुद्दा प्रकर्षाने उचलून धरत आहेत. पण, तरीही चित्रपटांना लागलेलं पायरसीचं हे ग्रहण काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याने कलाविश्वाची डोकेदुखी वाढली आहे.

  

हिंदी, तेलुगू, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांतील चित्रपटांनाही या पायरसीचा फटका बसत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्याकडून बऱ्याच बनावट वेबसाइट चावलण्यात येत असल्यामुळे, वारंवार डोमेन बदलत असल्यामुळे या वेबसाईटला आळा घालणं, त्या सर्व वेबसाईट बंद करणं हेसुद्धा निर्माते, दिग्दर्शकांपुढचं आव्हानच आहे. पायरसी वाढवणाऱ्या आणि चित्रपट ऑनलाईन लीक करणाऱ्या या साइटवर सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही तमिलरॉकर्सकडून सतत चित्रपट लीक केले जात आहेत.