मुंबई : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे वाक्य ज्याप्रमाणे प्रचलित आहे, त्याचप्रमाणे या असंख्य व्यक्ती आणि त्यांच्या तितक्याच असंख्य प्रवृत्तींमध्ये प्रेम या भावनेची परिभाषाही तितकीच वेगळी आणि प्रत्येकाला वेगळ्या अनुषंगाने उमगलेली. प्रेम आलं की आले नातेसंबंध, रागरुसवे आणि बरंच काही. यामध्ये ओघाओघानेच दुरावाही आलाच.
सध्या एका बॉलिवूड अभिनेत्याच्या वैवाहिक नात्यात असाच दुरावा आला. मुळात अनेक महिन्यांपूर्वीत पत्नीसोबतच्या त्याच्या नात्याला तडा गेला होता. ज्यावर काही दिवसांपूर्वी कौटुंबीक न्यायालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं.
तो अभिनेता म्हणजे अर्जुन रामपाल. वैवाहिक जीवनातील या टप्प्यातून अर्जुन फार लवकर सावरला. यात त्याला साथ मिळाली ती म्हणजे प्रेयसी Gabriella Demetriades हिची. अर्जुनला साथ देणाऱ्या या त्याच्या प्रेयसीने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक सुरेख पोस्ट शेअर केली आहे. ज्यामाध्यमातून तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचा उल्लेख, 'श्रीजी....' म्हणून केला आहे.
अर्जुनला शुभेच्छा देत गॅब्रिएलाने त्याच्यासोबतचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहता त्याच्या नात्याचा अनेकांनाच हेवा वाटत आहे. अर्जुन आणि ग्रॅब्रिएलाचा हा अंदाज पाहता चाहत्यांनीही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अर्जुन त्याच्या भूतकाळातील जीवनाला मागे सारत बराच पुढे आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने आणि प्रेयसी गॅब्रिएलाने एका लहान पाहुण्याचं स्वागतही केलं.