अर्जुन-मलायकाच्या रिलेशनशिपविषयी अनिल कपूर म्हणतात...

सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपविषयी चाहत्यांमध्ये असणारं कुतूहल काही केल्या कमी होत नाही. 

Updated: Dec 6, 2018, 12:26 PM IST
अर्जुन-मलायकाच्या रिलेशनशिपविषयी अनिल कपूर म्हणतात...  title=

मुंबई : सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपविषयी  चाहत्यांमध्ये असणारं कुतूहल काही केल्या कमी होत नाही. त्यातही हिंदी कलाविश्वात सध्याच्या घडीला सेलिब्रिटी जोड्यांविषयी बोलावं तर, एका जोडीवर सर्वांच्याच नजरा खिळतात. ती जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. 

अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं जाऊ लागलं. ज्यानंतर अर्जुन आणि मलायकाने विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र जाण्यासही सुरुवात केली. या दोघांनी कधीच त्यांच्या नात्यांचा खुलेपणाने स्वीकार केला नाही. पण, तरीही आता चर्चांचं वादळ हे थेट त्यांच्या लग्नापर्यंत येऊन पोहोचलं आहे. 

मुख्य म्हणजे आता या दोघांच्याही कुटुंबीयांसमोर त्यांच्या रिलेशनशिपविषयीचे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अर्जुन आणि मलायकाच्या नात्याविषयी अनिल कपूर यांना काही सल्ले देण्याची विचारणा करण्यात आली. अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या नो फिल्टर नेहा या शोमध्ये त्यांनी या जोडीला काही सल्ला द्यावा असं सांगण्यात आलं. 

अर्जुनचे काका, अनिल कपूर यांनी अतिशय सूचक वक्तव्य करत सर्वांचच लक्ष वेधलं. 'मी अर्जुनला खूप चांगला ओळखतो. ज्या गोष्टीमध्ये त्याला आनंद मिळतो, तिच मलाही आनंद देते असं म्हणत मी याविषयी फार प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं. 

कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आनंदात असेल तर त्यातच आम्ही सारे आनंद मानतो आणि यावरच आमचा विश्वासही आहे, असं म्हणत त्यांनी अर्जुन-मलायकाच्या नात्यावर आपली प्रतिक्रिया दिली.