मुंबई : रिअॅलिटी शोमुळे चर्चेत असणाऱ्या बॉबी डार्लिंग हिच्या वैवाहिक आयुष्यात आलेलं वादळ आता थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. बॉबीने तिचा पती रमणिक याच्यासोबतच्या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून, न्यायालयात याविषयीचा अर्जही दाखल केला आहे. पण, बॉबीच्या या अर्जावर नेमका निर्णय द्यायचा तरी कसा, हाच पेच आता न्यायालयासमोर उभा राहिला आहे.
बॉबी डार्लिंग हे नाव तसं फारसं अनोळखी नाही. तिचं खरं नाव आणि ओळख होती पंकज शर्मा अशी. ज्यानंतर लिंगबदल शस्त्रक्रिया करत बॉबी एक महिला झाली. त्यानंतर तिची नवी ओळख होती, पाखी. ही पाखी, बॉबी डार्लिंग या नावे प्रकाशझोतात आली. २०१६ मध्ये तिने भोपाळमध्ये रमणिक नामक गृहस्थाशी लग्न केलं. पण, त्यांचं हे नातं फार काळ टीकू शकलं नाही. घरगुती हिंसाचाराचा मुद्दा उचलत बॉबीने तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आणि अखेर घटस्फोटाचा अर्ज केला. पण, तिच्या या अर्जावर नेमकी सुनावणी करायची तरी काय, असाच प्रश्न आता न्यायालयासमोर उभा राहिला आहे.
बॉबीच्या पतीने त्यांचं हे लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार हे निराधार असल्याचा दावा केला आहे. लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर पुरूषाची महिला झालेल्यांना हिंदू विवाह कायदा आणि घरगुती हिंसाचार कायदा लागूच नसल्याचं त्याच्या वकिलांचंही म्हणणं आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या मुंबईच्या कौंटुंबीक न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. हे एकंदर प्रकरण पाहता, त्यावर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सध्या न्यायालयाने दिले आहेत. पुरुषाची झालेली बाई आणि तिनं केलेले घरगुती हिंसाचाराचे आरोप आणि घटस्फोटासाठीचा अर्ज असं हे देशातील पहिलंच प्रकरण आहे त्यामुळे यावर नेमका काय निर्णय दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.