'बाहुबली' फेम अभिनेत्याला हॉलिवूडची लॉटरी?

'बाहुबली' या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटांविषयी प्रेक्षकांच्या मनात असणारं प्रेम आणखी वाढलं. 

Updated: Feb 3, 2019, 11:02 AM IST
'बाहुबली' फेम अभिनेत्याला हॉलिवूडची लॉटरी?  title=

मुंबई : 'बाहुबली' या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटांविषयी प्रेक्षकांच्या मनात असणारं प्रेम आणखी वाढलं. खरंतर या चित्रपटांमुळे तरुणींच्या फेव्हरेट लिस्टचा भाग असणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत काही नावांची भर पडली. ती नावं म्हणजे अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबती. एकिकडे बाहुबली प्रभास सर्वांची मनं जिंकत असतानाच खलनायकी भूमिकेत झळकणारा राणाही अनेकांच्या मनावर राज्य करुन गेला. 

चित्रपट निर्मिती आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांमध्ये सक्रिय असणाऱ्या राणाला सध्या बॉलिवूडमध्येही चांगलं स्थान मिळत असून या कलाविश्वातही तो खऱ्या अर्थाने स्थिरावला आहे. बी- टाऊनमध्ये नावारुपास येत असतानाच आता राणाच्या वाट्याला आणखी एक संधी आल्याचं कळत आहे. त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण, येत्या काळात राणा कोणा एका हॉलिवूड चित्रपटात झळकू शकतो असं म्हटलं जात आहे. 

 
 
 
 

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

'नवभारत टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हॉलिवूडमधील एका मोठ्या चित्रपटासाठीचा प्रस्ताव राणापुढे ठेवण्यात आला असून, सध्या त्यावर चर्चा सुरु आहेत. या चित्रपटामध्ये राणा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या चर्चांचा निकाल काय असणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अद्यापही या आगामी प्रोजेक्टच्या चर्चाच कलाविश्वात सुरु आहेत त्यामुळे याविषयीची अधिकृत घोषणा कधी केली जाणार हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.