प्रदर्शनानंतर 'भाई' वादाच्या भोवऱ्यात, माफीची मागणी

'या चित्रपटातील पंडितजींच्या साकारण्यात आलेल्या व्यक्तिरेखेमुळे त्यांच्या कलेविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात'

Updated: Jan 16, 2019, 10:31 AM IST
प्रदर्शनानंतर 'भाई' वादाच्या भोवऱ्यात, माफीची मागणी   title=

मुंबई : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. लं. देशपांडे यांच्यावर आधारीत 'भाई – व्यक्ती की वल्ली' या सिनेमावरून आता वादंग निर्माण झालाय. या चित्रपटात पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर यांच्याविषयी चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करण्यात आलाय. याबद्दल चित्रपट निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी हिराबाई बडोदेकर आणि भीमसेन जोशी यांच्या कुटुंबीयांनी केलीय. 

बडोदेकर आणि जोशी कुटुंबीयांकडून एका पत्रकाद्वारे ही मागणी करण्यात आलीय. या चित्रपटातील पंडितजींच्या साकारण्यात आलेल्या व्यक्तिरेखेमुळे त्यांच्या कलेविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात, असंही या पत्रात म्हटलंय... त्यामुळे रसिकांनीच या चित्रपटाकडे पाठ फिरवावी, असं आवाहनही याद्वारे करण्यात आलंय. 

लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'भाई – व्यक्ती की वल्ली' या सिनेमाचं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलंय तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत, संगीत अजित परब यांनी दिलंय.

या सिनेमात पु ल देशपांडे यांची भूमिका सागर देशमुख या अभिनेत्यानं साकारलीय. पुलंसोबत त्यांच्या आजुबाजुची मंडळी अर्थात सुनीताबाई देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, बाबा आमटे अशा अनेक भूमिका या सिनेमात वेगवेगळ्या अभिनेत्यांनी बजावल्या आहेत. ४ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झालाय.