Bhabhiji Ghar Par Hai: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) हिनं 'भाभी जी घर पर हैं' (Bhabhiji Ghar Par Hai) या सुपरहिट कॉमेडी शोमधून अंगूरी भाभीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. या शोमधून तिनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
आजही ही मालिका लोकं घरोघरी पाहतात. शुभांगीचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. परंतु सध्या अशी एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे तिला ऑनलाईन फसवणूकीला सामोरे जावे लागलं आहे. तिनं याबाबतीत सायबर सेलकडे तक्रारदेखील केली आहे. या घटनेवरून तिनं सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना सतर्क देखील केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगी म्हणाली, 'माझ्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली. या प्रकरणी मला खूप त्रास झाला नसला तरी तो माझ्या मेहनतीचा पैसा होता. 8 सप्टेंबर रोजी मी माझ्यासाठी काही गोष्टी ऑनलाइन ऑर्डर केल्या होेत्या. मी ज्या ठिकाणाहून ऑर्डर करत होते ते एक प्रसिद्ध ऑनलाइन फॅशन अॅप आहे. मी ऑर्डर दिली आणि लगेचच मला एक फोन आला.
ती पुढे म्हणते, 'कॉलवर एक व्यक्ती मला असं म्हणाली की मी त्यांची खूप जुनी कस्टमर आहे तेव्हा मला तो कॉल खरा असल्यासारखं वाटलं कारण त्याच्याकडे माझे सर्व तपशीलही होते. आधी दोन मुली माझ्याशी बोलल्या आणि नंतर दोन मुलंही या कॉलमध्ये सामील झाली. शुभांगीने पुढे सांगितले की, त्या दोन्ही मुलांनी मला सांगितले की मी त्यांची प्रीमियम मेंबर आहे. तेव्हा ते मला एक प्रोडक्ट फ्री देणार आहेत. खरं म्हणजे मी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते कारण मला असे बरेच फोन येतात पण मला त्यांचा फार संशय आला नाही आणि मी त्यांना होकार दिला. त्यांनी मला काही पर्याय दिले ज्यातून मला माझ्यासाठी वस्तू खरेदी करायची होती.
त्यानंतर या लोकांनी मला फक्त जीएसटीची रक्कम भरावी लागेल असे सांगितले. मी जीएसटीची रक्कम दिली आणि माझ्या खात्यातून पैसे त्यांना दिले आणि तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे शुभांगीच्या लक्षात आले आणि तिने लगेच तिचे कार्ड ब्लॉक केले.
ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्यानंतर शुभांगीने लोकांना अशा फसवणुकीपासून सावध केले आहे. ती म्हणाली, ओटीपी शेअर न करण्यासोबतच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानवर फसवणूक करणारे तुमची फसवणूक करू शकतात त्यामुळे मी सर्वांना सावधगिरी बाळगण्यास सांगते.