मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा प्रसिद्ध कॉमेडी शो गेल्या 13 वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोमधील सर्व कलाकारांनी लोकांच्या मनात आपली खास ओळख निर्माण केली आहे.
या मालिकेत अब्दुल हे पात्र साकारणारा अभिनेता शरद सांकला या शोमुळे घराघरात पोहोचला. पण शरद आज यशाच्या उंच शिखरावर पोहोचला असला, तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे.
कॉमेडियन शरद सांकला यांचे बालपण गरिबीत गेले. तारक मेहतामध्ये छाप पाडण्यापूर्वी शरदने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
शरद सांकलाने शाहरुख खान, अक्षय कुमार यांसारख्या बड्या स्टार्ससोबत खूप काम केले आहे. तारक मेहताच्या अब्दुल अर्थात शरदने 1990 मध्ये 'वंश' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. वंश या चित्रपटात शरद चार्ली चॅप्लिनची भूमिका साकारताना दिसला होता.
शरदची चार्ली चॅप्लिनची व्यक्तिरेखा सर्वांनाच आवडली होती, तरीही तो इंडस्ट्रीत विशेष ओळख निर्माण करू शकला नाही. या चित्रपटातील चार्ली चॅप्लिनच्या भूमिकेसाठी शरदला दररोज 50 रुपये मिळत होते. यानंतर शरद सांकला बाजीगर, बादशाह आणि खिलाडी यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसला आहे. बॉलीवूड चित्रपटांमध्ये मेहनत करूनही या अभिनेत्याला ओळख मिळवता आली नाही.
इतकेच नाही तर शरद सांकला हा अनेक वर्षांपासून बेरोजगार होता, असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केला आहे. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधील अब्दुलच्या पात्राने त्याचे नशीब उलटले. आज शरद संकला यांच्याकडे सर्व काही आहे जे त्यांना मिळवायचे होते. एवढेच नाही तर शरद सांकला आज मुंबईत स्वतःचे दोन रेस्टॉरंटही चालवत आहेत.