Asur 2 review: काय खरं काय खोटं? कोण चांगला कोण वाईट? आयुष्याचं अंतिम सत्य काय? असे सवाल अनेकांच्या डोक्यात उपस्थित होत असतात. विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालत, मानवी नैतिकता चांगली की वाईट? यावर भाष्य करणारी वेब सिरीज 'असूर 2' नुकतीच जिओ सिनेमावर रिलीज करण्यात आली आहे. असूर ही पहिली वेब सिरीज जिथे संपते तिथूनच सुरू झालेली असूर 2 हा दुसरा सिझन अधिकच रोमांचक आहे. सीबीआयविरुद्ध रनशिंग पुकारलेला असूर म्हणजे शुभ जोशी आपल्या कार्याला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतो.
लहानपणापासून पौराणिक कथेचे संस्कार अंगिकृत करणारा शुभ जोशी सीबीआयविरुद्ध महायुद्धाची घोषणा करतो. हातवारे न करता, ना कोणते हावभाव दर्शवता कोणत्याही समोरच्या व्यक्तीवर प्रभुत्व गाजवण्याची कला असलेला शुभ आणि त्याचा असूर बनण्याचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यात दाखवण्यात आलाय. त्याचबरोबर असूरच्या दुसऱ्या सिझनमध्ये धनंजय राजपूत म्हणजेच अर्शद वारसीने देखील कमबॅक केलंय. फॉरेन्सिक तज्ञ निखिल नायर आपल्या अनुभवाच्या जोरावर शुभला पकडण्यात यशस्वी होतो का? की असूर आपल्या मायाअस्त्राचा वापर करून परिवर्तन घडवतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं.
खरा असूर कोण? केसर भारद्वाज की रसूल शेख? याचं उत्तर मिळता मिळता तुमचंही डोकं चक्रावून जाईल. सीबीआयची टीम प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. मात्र, सीबीआय खरंच असूरच्या मागे आहे का? असूरचा नेमका प्लॅन काय? याची उत्तरं तुम्हाला या सिरीजमधून मिळतील. मानवी नैतिकता ही चांगली असते की वाईट? नितिमुल्यांवर जगाला कंन्ट्रोल केलं जाऊ शकतं का? माणसाच्या वागणुकीतून त्याचं भविष्य काय असेल हे ठरवता येतं का? यावर भाष्य करणारी ही सिरीज नक्की पहावी.
आणखी वाचा - प्रिया बापटनंतर सई ताम्हणकरचा लेस्बियन सीन; नव्या सिरिजचा ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान, महायुद्ध जिंकण्यासाठी लहान लहान युद्ध हरावी लागतात. तुमच्या हातातील फोन किती घातक आहे, याची प्रचिती दर्शवणारी ही वेब सिरीज प्रत्येकाने एकदातरी नक्की पहावी. दिग्दर्शक ओनी सेन यांनी रंगवलेल्या बारीक गोष्टी या कथेला अधिक रोमांचक बनवतात. तसेच कथा लेखन या वेब सिरीजचं मुळ आहे. अरशद वारसी,बरुन सोबती,अनुप्रिया गोयनका,रिद्धी डोगरा,विशेष बंसल,शारिब हाशमी यांनी प्रत्येक कॅरेक्टर अगदी निपूनरित्या रंगवलं आहे. सुन्न करणारी आणि विचार करण्यास भाग पाडणारी ही वेब सिरीज एकदा तरी नक्की पहावी.