Ashi Hi Banwa Banwi Full Movie : मराठी कलाजगतात काही वर्षांपूर्वीच्या काळात डोकावून पाहिलं तर, त्या वेळच्या कलाकारांनी सादर केलेले कलाविष्कार आजही किती आणि कसे लोकप्रिय आहेत याचीच शाश्वती मिळते. मराठी भाषा वळवाल तशी वळते आणि त्यातून तयार होणारे विनोद अफलातून असतात ही बाब याच चित्रपटांमधून बऱ्याचदा पाहायला मिळाली. कृष्णधवल अर्थात Black and White चित्रपटांच्या दिवसांपासून रुपेरी पडद्यावर आलेल्या रंगीत दृश्यांपर्यंतच्या काळात बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांना चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरलं.
प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या या चित्रपटांच्या यादीतलं एक नाव म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा चित्रपट 1988 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत तो तितकाच किंबहुना त्याहूनही जास्त लोकप्रिय आहे.
(Ashok Saraf) अशोक सराफ, लक्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सचिन पिळगावकर, सुप्रिया, सिर्धार्थ रे, सुधीर जोशी, निवेदिता जोशी सराफ या आणि अशा अेक कलाकारांनी या चित्रपटात जीव ओतून अभिनय केला आणि त्यांच्या मेहनतीचं चीज चित्रपटाला मिळणाऱ्या लोकप्रियतेच्या रुपात झालं.
'अशी ही बनवाबनवी'तील प्रत्येक पात्र आजही सर्वांच्या लक्षात आहे. मग तो परशुराम असो किंवा धनंजय माने असोत. आता विषय धनंजय मानेंचाच निघाला आहे, तर त्यांच्या मालकीणबाई विसरून कसं चालेल? अभिनेत्री अश्विनी भावेनं या चित्रपटात साकारलेल्या शिस्तप्रिय मालकीणबाई अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेल्या. म्हणजे, चित्रपटात असणारा 'लिंबू कलरची साडी... ' हा डायलॉग बरेचजण आजही प्रत्यक्ष आयुष्यात बऱ्याचदा एकमेकांना संबोधून म्हणताना दिसतात.
या लिंबू कलरच्या साडीमधील बाईंचं चित्रपटातील नाव तुम्हाला आठवतंय का? 'मिस्टर माने...' असं म्हणत धनंजय माने अर्थात अशोक सराफ यांना दरडावणाऱ्या या बाई 'लिंबू कलरच्या साडी'मुळं इतक्या लोकप्रिय झाल्या की, त्यांच्या पात्राचं नाव मात्र काहीसं मागे पडलं. चित्रपटात (Ashwini bhave) अश्विनी भावनेनं साकारलेल्या पात्राचं नाव होतं, 'माधुरी'. काही आठवतंय का?
त्या काळात प्रदर्शित झालेल्या 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटानं 3 कोटी रुपयांची कमाई केली होती. इंटरनेटवर प्राथमिक माहितीच्या स्वरुपात हा आकडा उपलब्ध आहे. जवळपास 35 वर्ष उलटूनही दर आठवडाअखेरीस हा चित्रपट टीव्हीवर लागतो आणि तो कितींदाही पाहिला असूनही पुन्हापुन्हा पाहण्यासाठी अनेकांचीच उत्सुकता शिगेला पोहोचते. अशा या बनवाबनवीतील तुमचं आवडचं पात्र आणि आवडता Scene कोणता?