मुंबई : धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर होणारा भेदभाव 'आर्टिकल-१५' या चित्रपटात टीपण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केला. २८ जून रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तीन को़टींचा गल्ला जमा केला. तर प्रदर्शनाच्या सलग पाचव्या दिवशी चित्रपटाने २४ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली. चित्रपटात अभिनेता आयुषमान खुराना पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकत आहे.
'आर्टिकल-१५' चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत चाहत्यांच्या समोर आला आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेला चाहत्यांकडून त्याचप्रमाणे समीक्षकांकडून उत्तम दाद मिळत आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केला आहे.
#Article15 is super-strong on the crucial Mon... Braves #KabirSingh juggernaut + torrential rains in #Mumbai, yet stays solid at key metros... Eyes ₹ 34 cr [+/-] in Week 1... Fri 5.02 cr, Sat 7.25 cr, Sun 7.77 cr, Mon 3.97 cr. Total: ₹ 24.01 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) July 2, 2019
'इन्साफ की भीक मत मांगो, बहुत माँग चुके...' फक्त तीन रूपयांसाठी दोन बहिणींचा सामुहिक बलात्कार करण्यात येतो. विविध जातींच्या पेचात अडकलेले लोक. आपली जात सर्वात श्रेष्ठ समजणाऱ्या उच्चवर्णींयांमुळे समाजात पसरलेली असमानता. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांमध्ये होणारा भेदभाव इत्यादी विषयांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसते.
चित्रपटाची कथा २०१४ मध्ये उत्तर प्रदेशच्या बदायूं येथे झालेल्या सामूहिक बलात्कारावर आधारलेली आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली होती. 'आर्टिकल-१५' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारलेला आहे. २१व्या शतकात सुद्धा जनता जात, पात, लिंग, वंश इत्यादींच्या जाळ्यात अकलेली आहे हे दाहक वास्तव चित्रपटातून मांडण्यात आलं आहे.