मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शनिवारी मध्य प्रदेशातील इंदुर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत असतानाच त्यांनी हे लक्षवेधी वक्तव्य केलं. देशात सध्याच्या घडीला सरकारविरोधी बोलणाऱ्यांना लगेचच देशद्रोही ठरवण्यात येतं, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं. यावेळी बाबरी मशीद प्रकरणावरही त्यांनी ओझरता प्रकाशझोत टाकला.
भारताची विभागणी करण्यांविषयी बोलणारे देशहितवादी नसल्याचं म्हणत त्यांनी बाबरी मशिद प्रकरणावर प्रकाशझोत टाकला. सर्व स्तरांमध्ये चर्चेत असणाऱ्या बाबरी मशीद मुद्द्यावर आझमी यांनी वक्तव्य करत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ज्यावेळी मशीद पाडण्यात आली तेव्हा खुद्द भगवान रामालाही याचं दु:खच झालं असेल जे स्वत: शांततेचे प्रणेते आहेत, असं त्या म्हणाल्या. एकंदरच या विषयावर होणाऱ्या हिंसेवर आणि राजकारणावर त्यांनी सौम्य शब्दांत टीका केली.
'देशाच्या एकंदर कारभारात किंवा कोणत्याही बाबतीत असणाऱ्या त्रुटी अधोरेखित करण्याची बाब चुकीची नसल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. त्रुटींविषयी खुलेपणाने चर्चा केली जाणं हे कधीही महत्त्वाचं आणि तितकंच गरजेचं आहे, कारण तेच देशहिताचं आहे', असं त्या म्हणाल्या. देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कोणत्याही मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले नाहीत, त्यातील त्रुटी समोर आणल्या नाहीत तर परिस्थिती कधीच सुधारणार नाही हा मुद्दा त्यांनी स्पष्टपणे मांडला. यालाच त्यांनी देशातील सद्यस्थितीची जोड दिली.
हल्लीच्या दिवसांमध्ये सरकारची निंदा केली किंवा सरकारवर टीका केली असता लगेचच तुम्ही देशद्रोही ठरता, असं त्या म्हणाल्या. यावेळी आझमी यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव न घेता जनतेने ठामपणे त्यांची मतं मांडावीत यासाठी आग्रही सूर आळवला. सोबतच कोणालाही कोणाकडूनही देशभक्तीचं प्रमाणपत्र मिळवण्याची गरज नसल्याचंही त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.
S Azmi in Indore:For the betterment of our country it's necessary that we point out our flaws.If we don't,how can our conditions improve?But atmosphere is such that if we criticise govt we're branded as anti-nationals.We shouldn't be afraid,nobody needs their certificate.(July 6) pic.twitter.com/epCe2nmGTQ
— ANI (@ANI) July 7, 2019
भारताच्या सांस्कृतिक वारसा पाहता प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान वाटतो. परिणामी तो जतन करण्यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न केला जातो असं म्हणत जातीयवादाच्या मुद्दायावरुन उसळणाऱ्या दंगलींचा फटका हा महिला वर्गालाच जास्त बसत असल्याचं त्यांनी उदाहरणासह अधोरेखित केलं. अनेकांची घरं उध्वस्त होतात, या महिलांच्या मुलाबांळांवरही या परिस्थितीचा परिणाम होतो, असं त्या म्हणाल्या.