मुंबई : सैराटचे कलाकार रिंकु राजगुरू, आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे पाठोपाठ आता मराठीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे देखील मेणाचे पुतळे तयार झाले आहेत.
आता देवगड येथील वॅक्स म्युझियममध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता अंकुश चौधरी यांचे मेणाचे पुतळे साकारण्यात आले आहेत. याचे अनावरण नितेश राणे आणि स्वतः अंकुश चौधरी, अमृता खानविलकर यांनी केले आहे.
वॅक्स कलावंत सुनील कंडलूर यांनी अमृता आणि अंकुश यांचे मेणाचे पुतळे बनवण्याचे काम हाती घेतले होते.. पुतळ्यासाठी आवश्यक मोजमाप घेतल्यानंतर सुनील हे या पुतळ्यांचे काम पूर्ण केले. सुनील यांनीच रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नागराज यांच्यासह शंभरहून अधिक नावाजलेल्या लोकांचे मेणाचे पुतळे तयार केले आहेत.
लंडनमधील मादाम तुसॉदच्या धर्तीवर देवगड येथे उभारण्यात आलेल्या वॅक्स म्युझियमने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ठिकाणी आतापर्यंत शंभरावर पुतळे साकारण्यात आले आहेत. त्यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कपिल देव, महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतळे लक्षवेधी ठरले आहेत.