मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. नागा चैतन्य आजकाल त्याच्या बॉलिवूड डेब्यू फिल्म लाल सिंह चड्ढामुळे चर्चेत आहे.
या चित्रपटात अभिनेता नागा चैतन्य आमिर खानच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. याशिवाय त्याची अपकमिंग फिल्म 'लवस्टोरी' चित्रपटाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. नागा चैतन्य या चित्रपटात अभिनेत्री सई पल्लवीच्या सोबत दिसणार आहे. दरम्यान, चित्रपट स्टार नागा चैतन्यने पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एका मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत.
जेव्हा त्याला मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हा अभिनेता म्हणाला, ''मला वाटतं की, मी माझ्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर हे समजून घेतलं आहे की, मी माझं वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफ कधीही मिसळत नाही. मी माझ्या कुटुंबातून माझ्या पालकांना पाहिल्यानंतरच ही सवय सुरू केली.''
या व्यतिरिक्त, जेव्हा नागा चैतन्यला प्रत्येक क्षणी त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या मीडिया कव्हरेजबद्दल विचारण्यात आलं तेव्हा अभिनेता म्हणाला, 'सुरुवातीला तो खूप अस्वस्थ असायचा. नंतर नंतर मला वाटलं की, आजच्या काळात फक्त बातम्या बदलतात. हे असं होतं की, हे मनोरंजन आहे. आज जी बातमी आहे ती उद्या नसेल. उद्या आणखी काहीतरी बातमी समोर येईल. आजच्या बातम्या विसरल्या जातील. माझ्या आजोबांच्या काळात मासिके यायची. जे महिन्यातून एकदा यायचे.
ती बातमी पुढील बातमी येईपर्यंत जिवंत राहायची. पण आज बातमी दुसऱ्या सेकंदाला बदलते. लोकांना त्याबद्दल आठवतही नाही. आज बातम्या फक्त टीआरपी वाढवण्यासाठी केल्या जातात. मला हे जाणवल्यापासून मी या गोष्टींची पर्वा केली नाही.