Man Vs Wild मध्ये एकत्र झळकणार खतरों के 'खिलाडी'

बेअर ग्रिल्सच्या कार्यक्रमात झळकणार बॉलिवूडचा साहसी अभिनेता

Updated: Jan 30, 2020, 07:15 AM IST
Man Vs Wild मध्ये एकत्र झळकणार खतरों के 'खिलाडी'  title=
Man Vs Wild मध्ये एकत्र झळकणार खतरों के 'खिलाडी'

मुंबई : Man Vs Wild या कार्यक्रमाला भारतीय प्रेक्षकांमध्ये चांगलीच पसंती आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता आणि अर्थातच बेअर ग्रिल्स याची काही साहसी कृत्य पाहता, या कार्यक्रमाचा वाढचा प्रतिसाद पाहता भुवया उंचावण्याचं कारण नाही. मालिकांच्या गर्दीतही Man Vs Wildची वेगळीच उत्सुकता अनेकांनाच लागलेली असते. अशा या कार्यक्रमामध्ये येत्या काळात सुपरस्टार रजनीकांत झळकणार आहेत. नुकतंच त्यांनी यासाठीचं चित्रीकरणही केलं. 

रजनीकांत हेसुद्धा बेअरच्या कार्यक्रमात झळकणार असल्याची उत्सुकता असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. ही माहिती म्हणजे, खिलाडी कुमारनेही Man Vs Wild या कार्यक्रमासाठीच्या चित्रीकरणासाठी थेट कर्नाटक गाठलं आहे. 

हिंदी कलाविश्वात त्याच्या साहसासाठीसुद्धा ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमार याचे मैसूर विमानतळावरील फोटो बुधवारी सोशल मीडियावर पाहायला मिळाले. विमानतळावरुन त्याने थेट बंदीपूर गाठलं असल्याचं कळत आहे. शिवाय गुरुवारी तो या कार्यक्रमासाठीचं चित्रीकरण करणार असल्याचं म्ह्टलं जात आहे. 

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाविश्वातील दोन मोठ्या चेहऱ्यांचा बेअरच्या कार्यक्रमातील सहभाग पाहता आता, या अनोख्या प्रवासातून ते नेमके कोणत्या वाटांवर निघणार आहेत आणि Man Vs Wildच्या अलिखित नियमानुसार रुपेरी पडद्यावर दिसणारे हे सेलिब्रिटी नेमकी कोणती थरारक कृत्य करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.