Kavita Chaudhary Died : 'उडान' या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री आणि निर्माता कविता चौधरी यांचे निधन झाले आहे. त्यांनी अमृतसरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं झालं. दूरदर्शनवर असलेल्या 'उडान' आणि 'योर ऑनर' या मालिकांमधून त्यांनी सगळ्यांची मने जिंकली. कविता या 67 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सगळे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, आज त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होणार आहे. कविता चौधरी यांनी 'उडान' या मालिकेत आयपीएस अधिकारी कल्याणीची भूमिका साकारली होती. त्याशिवाय कविता यांनी 'योर ऑनर' आणि 'आईपीएस डायरीज' सारख्या शोमध्ये काम केलं.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये कविता चौधरी यांचे बॅचमेट असलेले अभिनेता अनंग देसाई यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की कविता चौधरी यांचे काल निधन झाले. तर कविता यांचा भाजा अजय सयालनं सांगितलं की कविता या गेल्या काही दिवसांपासून अमृतसरच्या पार्वती देवी रुग्णालयात यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल रात्री 8.30 वाजता अमृतसरच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कविता चौधरी या काही वर्षांपूर्वी कॅन्सरझी झूंज देत होत्या आणि बऱ्याच काळापासून त्यांच्यावर त्याचे उपचार सुरु होते. तर त्यांच्या पार्थीवावर अमृतसरमध्येच अंत्यसंस्कार होणार आहे.
हेही वाचा : 'वडिलांना कंटाळलो, घरात 3 बहिणी...': एकदा रेल्वे ट्रॅकवर आयुष्य संपवायला निघालेले जॉनी लिव्हर
त्यांच्या 'उडान' या मालिकेविषयी बोलायचे झाले तर 1989 मध्ये ही मालिका प्रदर्शित झाली होती. त्यांनी शोचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही केलं होतं. ही मालिका त्यांची बहीण कंचन चौधरी भट्टाचार्यच्या जीवनावर आधारीत होती. ज्या किरण बेदी यांच्यानंतर झालेल्या दुसऱ्या आयपीएस अधिकारी होत्या. या मालिकेतून त्या महिला सशक्तिकरणासाठी सगळ्यांना प्रेरणा द्यायच्या. कारण चित्रपट आणि मालिकांमध्ये महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या जास्त भूमिका नव्हत्या.