'...आता मला श्वास घ्यायलाही भीती वाटतेय', रजनीकांत यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

सुपरस्टार रजनीकांत यांनी 1995 मध्ये राजकारणात एंट्री केली होती. 'रजनी मक्कल मंद्रम' असे त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव होते. पण 2021 मध्ये त्यांनी राजकीय संन्यास घेत पक्ष विसर्जित केला होता.

Updated: Mar 21, 2024, 03:42 PM IST
'...आता मला श्वास घ्यायलाही भीती वाटतेय', रजनीकांत यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया title=

Rajinikanth Latest Speech : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचे राजकारणाशी फारच जवळचे नातं आहे. यात एनटी रामाराव, जयललिता, विजय कांत, चिरंजवी, पवन कल्याण आणि कमल हसन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या नावाचा समावेश होतो. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. संपूर्ण देशभरात 19 एप्रिलपासून 1 जून अशा सात टप्प्यात मतदान होईल. या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. आता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

चेन्नईतील एका रुग्णालयाच्या नवीन शाखेच्या उद्घाटनासाठी रजनीकांत यांना आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना गंमतीशीर किस्सा सांगितला. त्यासोबतच त्यांनी लोकसभा निवडणुकांचा उल्लेखही यादरम्यान केला. यावेळी रजनीकांत यांनी "सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मला तोंड उघडायलाही भीती वाटते." असे म्हटले. 

कमल हसन यांच्याबद्दलही केले वक्तव्य

"यापूर्वी जेव्हा कावेरी रुग्णालय कुठे आहे, असे विचारले जायचे, तेव्हा लोक कमल हसन यांच्या घराजवळ असे सांगायचे. पण आता जेव्हा कमल हसन यांचे घर कुठे आहे, अशी विचारणा होते, तेव्हा लोक कावेरी रुग्णालयाजवळ असे सांगतात", असे रजनीकांत मस्करीत म्हणाले. त्यापुढे त्यांनी "मी इथे उपस्थित असलेल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही सांगू इच्छितो की, आता तुम्ही रजनीकांतने कमल हसनशी पंगा घेतला असे काही लिहू नका. मी जे सांगितलं ती फारच सामान्य गोष्ट आहे", असा टोलाही त्यांनी लगावला. 

"मला आता श्वास घ्यायलाही भीती वाटतेय"

"मी तुम्हाला खरं सांगू तर मला इथे बोलण्याची अजिबात इच्छा नाही. पण मला दोन शब्द तरी बोला, असे सांगण्यात आले आहे. त्यावेळी मी या कार्यक्रमात मीडियाही असणार का, असे विचारले होते. त्यावर त्यांनी ठराविक मीडिया असेल, असे सांगितले होते. पण आता समोर इतके कॅमेरे पाहून मला भीती वाटत आहे. त्यात आता निवडणुकांचेही बिगुल वाजले आहे. त्यामुळे आता तर मला श्वास घ्यायलाही भीती वाटत आहे", असेही रजनीकांत यांनी यावेळी म्हटले. 

दरम्यान रजनीकांत यांच्या या भाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी 1995 मध्ये राजकारणात एंट्री केली होती. 'रजनी मक्कल मंद्रम' असे त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव होते. पण त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी राजकीय संन्यास घेत पक्ष विसर्जित केला. सध्या ते वेट्टैयन या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन टी. जे. ज्ञानवेल करत आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, फहद फासिल आणि राणा दग्गुबती झळकणार आहेत.