62 वर्षाच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्यावर 3 मुलांवर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप

 तीन पुरुषांसोबत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Updated: Jun 14, 2022, 07:34 PM IST
62 वर्षाच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्यावर 3 मुलांवर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप title=

मुंबई : हॉलिवूड अभिनेता केविन स्पेसी संबधित मोठी बातमी समोर येत आहे. ब्रिटिश पोलिसांनी केविनविरुद्ध तीन पुरुषांसोबत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. ६२ वर्षीय केविन स्पेसीला गुरुवारी लंडन न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.

लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, 'केविन स्पेसी याच्यावर सोमवारी, 13 जून रोजी तीन पुरुषांच्या लैंगिक शोषणाचा औपचारिक आरोप करण्यात आला होता. याशिवाय केविनवर एका व्यक्तीसोबत त्याच्या इच्छेविरुद्ध लैंगिक कृत्य केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात केविनला गुरुवारी सकाळी 10 वाजता वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर राहावं लागणार आहे.

अनेक मोठे आरोप झाले आहेत
केविनवरील आरोपांसाठी पोलिसांनी गोळा केलेल्या सर्व पुराव्यांचा आता आढावा घेतला जाणार आहे. 2005 मध्ये, केविनवर लंडनमध्ये एका व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. ऑगस्ट 2008 मध्ये, केविनवर दुसर्‍या पुरुषावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता आणि नंतर एप्रिल 2013 मध्ये, त्याच्यावर ग्लुसेस्टरशायरमध्ये दुसर्‍या पुरुषाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपही आढळून आला.

ऑस्कर पुरस्कार विजेता केविन 
केविन स्पेसी हा प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आहे. त्याने 1980 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हार्टबर्न आणि वर्किंग गर्ल हे त्याचे पहिले चित्रपट होते. मात्र, 1995 मध्ये त्याला द यूझुअल सस्पेक्ट्समधून ओळख मिळाली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. यानंतर, त्याने 1999 मध्ये अमेरिकन ब्युटी चित्रपटात काम केलं आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला.

2017 मध्ये आरोप सुरू झाले
केविनला त्याच्या हाऊस ऑफ कार्ड्स शोमध्येही खूप यश मिळालं. 2017 मध्ये त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होऊ लागले. अभिनेता अँथनी रॅपने ऑक्टोबर 2017 मध्ये केविनवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. रॅपने सांगितलं की, 1986 मध्ये तो 14 वर्षांचा असताना केविनने नशेत असताना त्याचा गैरफायदा घेतला. तेव्हा केविन २६ वर्षांचा होता. त्यानंतर 2020 मध्ये, रॅपने स्पेसीच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या आरोपांसह गुन्हा दाखल केला. यानंतर आणखी 15 लोकांनी केविन स्पेसीच्या विरोधात शोषणाची कहाणी मांडली.