मुंबई : रुपेरी पडद्यावर झळकत प्रेक्षकांसमोर अनोख्या अंदाजात आपलं अभिनय कौशल्य सादर करणारे सुपरस्टार रजनीकांत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. फक्त सोशल मीडियावरच नव्हे, तर कलाविश्वापासून, प्रवासवेड्या मंडळींपर्यंत सर्वांमध्येच त्यांची चर्चा सुरु आहे. याला निमित्तं ठरतंय ते म्हणजे Man Vs Wildचाच एक भाग असणाऱ्या Into the Wildमधील त्यांचा सहभाग.
बेअर ग्रिल्स याच्यासोबत Into the Wildच्या निमित्ताने त्यांनी एका खास भागाचं चित्रीकरण पूर्ण केलं. ज्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बेअरचे आभारही मानले. इथे हा भाग पाहायला कधी मिळणार याविषयीच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता यामध्ये विरझण पडल्याची चिन्हं आहेत.
राष्ट्रीय अभयारण्यात चित्रीकरण केल्यामुळे रजनीकांत यांच्यावर अनेकांचा रोष ओढावला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार काही कार्यकर्त्यांनी या चित्रीकरणासाठी रजनीकांत यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अभयारण्यात चित्रीकरण करणं हे तेथे असणाऱ्या प्राण्यांसाठी घतक ठरु शकतं असं कारण देत ही तक्रार करण्यात आल्याचं कळत आहे.
Thank you very much dear @BearGrylls for an unforgettable experience ... love you. @DiscoveryIN thank you #IntoTheWildWithBearGrylls
— Rajinikanth (@rajinikanth) January 29, 2020
जोसेफ हूवर असं नाव असणाऱ्या एका कार्यकर्त्यांकडून हे चित्रीकरण पावसाळी दिवसांमध्ये केलं जावं असं सुचवण्यात आलं होतं. जेव्हा जंगलामध्ये वणवा लागण्याची भीती कमी असते. मुख्य म्हणजे 'पाणी वाचवा', हाच संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी रजनीकांत या कार्यक्रमातून त्यांच्या चाहत्यांना आवाहन करतील. आता हे सर्व प्रकरण पाहता रजनीकांत यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.