मुंबई विद्यापीठावर पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा पेपरमध्ये दुसऱ्या दिवशीही तांत्रिक गोंधळ झाला.  

Updated: Oct 6, 2020, 07:27 PM IST
मुंबई विद्यापीठावर पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की  title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा पेपरमध्ये दुसऱ्या दिवशीही तांत्रिक गोंधळ झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झालेत. या गोंधळामुळे पेपर पुढे ढकलण्याची मुंबई विद्यापीठावर नामुष्की ओढवली आहे. शेवटच्या वर्षाच्या परीक्षांवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद रंगला. त्यात न्यायालयाने केंद्रातील युजीसीच्या बाजूने निर्णय दिला आणि परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. पण सध्या विविध विद्यापीठांनी या ऑनलाईन परीक्षेत जो घोळ घातला आहे. त्यामुळे शिक्षण नको पण परीक्षा आवर असे म्हणायची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. 

कालचा गोंधळ बरा होता, असं म्हणण्याची वेळ मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर आली आहे. कारण लागोपाठ दुसऱ्या दिवशी टीवायबीए, टीवायबीकॉमसह आयडॉलच्या म्हणजे दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्ष परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ झाला. लॉग इन होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नाही. हेल्पलाईनवर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर आजचे पेपर रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर आली. 

दरम्यान, परीक्षेतल्या या गोंधळाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, अशा शब्दांत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तर गोंडवाना विद्यापीठासह सर्व ठिकाणी परीक्षा सुरळीत सुरू असल्याचा दावा उच्च शिक्षणमंत्र्यांनी केलाय. तांत्रिक कारणामुळं परीक्षा राहिल्यास ती पुन्हा घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले.

आधीच कोरोनामुळं परीक्षा होणार की नाहीत, यावरून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होता. आता परीक्षा होतायत, पण गोंधळ मात्र मागील पानावरून पुढं सुरूच आहे.