'टाईम मॅनेजमेंट'ने करा यशाचे शिखर पार

आज आम्ही तुम्हाला काही अशा टीप्स देणार आहोत. ज्या तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करण्यसाठी महत्त्वाची मदत करू शकतात

Updated: Jun 30, 2018, 11:42 AM IST
'टाईम मॅनेजमेंट'ने करा यशाचे शिखर पार title=

नवी दिल्ली: 'खूप काही करायचे आहे. मला त्या गोष्टीत आवडही आहे. पण, काय करायचे. वेळच मिळत नाही हो....!', अशी वाक्ये नेहमीच कानावर पढत असतात. लोक असे बोलतात खरं. पण, गंमत अशी की, यात फारसे तथ्य कधीच नसते. कारण, ज्याला काळ, काम, वेगाचे गणित जमते त्याला वेळ मिळतोच. मग ती व्यक्ती किती का व्यग्र असेना. खरं सांगायचं तर, वेळेचे व्यवस्थापन (टाईम मॅनेजमेंट) ही एक कला आहे. प्रत्येक जण ती शिकायचा प्रयत्न करतो. पण, कुठेतरी माशी शिंकते आणि टाईम मॅनेजमेंटला खिळ बसते. आज आम्ही तुम्हाला काही अशा टीप्स देणार आहोत. ज्या तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करण्यसाठी महत्त्वाची मदत करू शकतात

ध्येय निश्चिती

वेळेचे अचूक व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची ती ध्येय निश्चीत. वेळेचे व्यवस्थापन करताना तुमचे नजिकच्या काळातील लघू आणि दीर्घ लक्ष्य ठरायला हवे. याला शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोल असेही म्हणतात. लक्षात ठेवा कोणतेही ध्येय न ठेवता काम करत राहिला तर त्यातून भविष्यात तुम्हाला काडीचाही फायदा होणार नाही. म्हणूनच आगोदर ध्येय निश्चिती महत्त्वाची. 

प्राधान्यक्रम ठरवा

वेळेचा अभाव असल्याचे कारण देत अनेकदा गोष्टी टाळल्या जातात किंवा एकाच वेळी अनेक गोष्टी केल्या जातात. त्यामुळे कोणतेच काम होत नाही. होणारे काम मात्र आडून राहते. त्यामुळे कामांचा प्राधान्यक्रम ठरवा. दिवसभरात तसेच, येत्या काळात तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत. मग ती कामे किती कालावधीत आणि कोणत्या पद्धतीने करायची आहेत याबाबत गांभीर्याने विचार करा, असे केल्याने तुमचे कामही अडणार नाही आणि तुमचे परावलंबित्वही कमी होईल.

काम टाळण्याचे बंद करा

वेळ नसल्याच्या सबबीखाली अनेकदा कामे टाळली जातात. पण, असे केल्याने तुम्ही आळशी असल्याचे सिद्ध होते. त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे कामाला प्राधान्य द्या. कामे टाळू नका.

विश्रांती घ्या

अनेक लोकांना सतत कामात व्यग्र राहण्याची सवय असते. त्यामुळे ते अविश्रांतपणे काम करत राहतात. अशाने या मंडळींच्या कामाच्या गतीवर परिणाम होतो. हे लोक कितीही कार्यकरत (अॅक्टीव्ह) असल्याचे दाखवत असले तरी, मुळात ते कंटाळलेलेच असतात. म्हणूनच कामातून अधून-मधून विश्रांती घेत चला. कधी ही विश्रांती अल्पशी असावी तर, कधी दीर्घ प्रमाणात असेल तरीही उत्तम.

मिळून वाटा उचला

अनेकांना वाटते की, आपणच सर्वतज्ज्ञ आहोत. हा गैरसमज आहे. या गैरसमजातून अशी मंडळी अनेक कामांचे ओझे डोक्यावर घेऊन बसतात आणि कोलमडून पडतात. त्याऐवजी कामांची विभागणी करा. शक्य तितकी जबाबदारी स्वत:कडे घ्या. इतर कामे इतरांवरही सोपवा. ज्यामुले तुम्हालाही तुमच्यासाठी वेळ मिळेल.