शीतल शिंदे, मुंबई : कविता... कविता म्हणजे नक्की काय...? कविता का लिहितात ...? ती लिहितात कशी..? काय मिळते कविता लिहून...? एखाद्या कागदावर शब्द मांडून काय समाधान मिळते...? अश्या असंख्य प्रश्नांचे उत्तर कविताप्रेमी आपल्यापरीने शोधत असतो...
खरे तर, कविता म्हणजे कोणासाठी प्रेम, तर कोणासाठी अहंकार... कोणासाठी भाव, तर कोणासाठी विचार...तर कोणासाठी आपला आक्रोश मांडण्याचं उत्तम साधन... सोपं नसतं एखाद्या कोऱ्या कागदावर असं काही मांडणं ज्यात सर्व भाव उमटून दिसावेत... जेव्हा सर्व भाव एकत्र येऊन खोळंबा तयार होतो तेव्हा सुरू होते शब्द शोधण्याची प्रतिक्रिया मग त्या शब्दांच चिंतन करून तयार होतात ओळी आणि त्या ओळींमधून बनते एक कविता...
प्रत्येकासाठी कवितेचे वेगवेगळे अर्थ असतात... काहींसाठी ती मज्जा तर काहींसाठी ते आपलं दुःख व्यक्त करण्याचं साधन... कोणी लिहून हसतात, तर कोणी रडून लिहितात... काहींसाठी ते मन मोकळं हास्य तर काहींच्या अश्रुंचे ते विकार...
जस उत्तम लेखक, कविताकार होण्यासाठी लिहिणं महत्वाचं असतंं. कवितेचं वाचन करून ती समजून घेणं सुद्धा एक कला आहे....सर्वजण कविता वाचतात पण सर्वानाच ती कळेलच असं नाही ... म्हणून तर म्हणतात जो पर्यंत या कावितेचे पेय कोणी पित नाही तो पर्यंत कितीही प्रयत्न करा ती गळी उतरत नाही ...कारण कविता वाचत नसतात कविता अनुभवतात... जेव्हा शब्दांचा स्पर्श अंगावर शहारे आणतात, तेव्हा समजून जा ती तुमच्यापर्यंत पोहचली... अगदी काळजाच्या दाराला जाऊन भिडली...पण एक मात्र नक्की मला उमगले कविता कधीच लिहिली नाही जात ती हृदयातून कागदावर आपोआप मांडली जाते.