युवा सुपरस्टार्सना टशन देणारा एकमेव महानायक

बॉलिवूडचे महानायक, बॉलिवूडचे सुपरस्टार, बॉलिवूडचे बिग बी...

Updated: Sep 25, 2019, 09:45 PM IST
युवा सुपरस्टार्सना टशन देणारा एकमेव महानायक title=

प्रशांत अनासपुरे, झी २४ तास, मुंबई : बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर बिग बींच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर उमटली. अर्थातच पिढ्या बदलल्या सुपरस्टार बदलले मात्र एक नाव कायम चर्चेत राहिलं ते म्हणजे अमिताभ बच्चन....

अमिताभ बच्चन...बॉलिवूडचे शहेनशाह, बॉलिवूडचे महानायक, बॉलिवूडचे सुपरस्टार, बॉलिवूडचे बिग बी...अशी वेगवेगळी ओळख एकाच नावाभोवती फिरणारं भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं हे अनोखं नाव. वयाची पंचाहत्तरी उलटल्यानंतरही ज्या उत्साहाने आणि ज्या जिद्दीने, तडफेने अमिताभ काम करत आहेत ते पाहून भलेभले चकीत होतात. 

दिलीप कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान, रणबीर कपूर ते रणवीर सिंग.. अशा चित्रपटसृष्टीत पिढ्या बदलल्या मात्र या बदलल्या पिढीबरोबरही तितक्याच दमदारपणे तोडीस तोड काम करणारं नाव म्हणजे अमिताभ हरिवंशराय बच्चन.. अमिताभ यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय. 

भारत सरकारतर्फे या पुरस्काराची घोषणा करण्यात आलीये. अमिताभ हे असं नाव आहे जे आजही ७६ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग आहे. अमिताभ बच्चन या नावाला आजही तितकंच वलय आहे. १९६९ मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडच्या पडद्यावर अमिताभ यानी पदार्पण केलं. पुढे यशअपयशाचा सामना करत आपला एक वेगळा ठसा उमटवला. 

आज २०१९ मध्येही सर्वाधिक व्यस्त असणाऱ्या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन हेच नाव समोर येतं. एकीकडे खान मंडळी, खिलाडी अक्षयकुमार, रणवीर सिंग, रणबीर कपूर, नवाजुद्दीन, आयुष्यमान खुराणा असे नव्या पिढीचे अनेक नवे नायक स्पर्धेत असतानाही अमिताभ या नावाचा महिमा आजही तितक्याच दमदारपणे आपलं वेगळं स्थान टिकवून आहे. 

म्हणूनच आताच्या युवा सुपरस्टार म्हणवणाऱ्या अभिनेत्यांकडे नसतील एवढे चित्रपट एकट्या अमिताभ यांच्याकडे आहेत. जुंड, साय रा नरसिंहा रेड्डी, तेरा यार हू मै,  एबी आणि सीडी, ब्रह्मास्त्र, गुलाबोसिताबो अशा अनेक नवनव्या चित्रपटांमध्ये आगामी काळात बॉलिवूडचा हा महानायक मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. वेळेचं वेळापत्रक नेहमीच काटेकोरपणे सांभाळणाऱ्या या महानायकाला प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केल्याने चाहत्यांचा आनंद नक्कीच द्विगुणीत झाला असणार... 

खरंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आणखी एक नाव महाराष्ट्रातून फाळके पुरस्कारासाठी चर्चेत होतं. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनाही फाळके पुरस्कार मिळावा, अशी त्यांच्या चाहत्यांची खूप इच्छा आहे. मात्र पुन्हा एकदा सुलोचना दीदींना डावलण्यात आल्याने चाहत्यांची निराशा झाली. मात्र ज्या दीदींना हा महानायक आईसमान मानतो. त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. अशा मुलासमान या नायकाला सिनेसृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला याचा खुद्द सुलोचना दीदींनाही नक्कीच आनंद झाला असेल हे नक्की.