जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा सिनेमा, 'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो रिलीज झाला आहे. चित्रपटाचा प्रोमो पाहिल्यानंतर असं वाटतं की, हा एक वास्तववादी सिनेमा आहे. 'मुळशी पॅटर्न' या सिनेमावर टीका देखील झाली होती, पण प्रवीण तरडे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्येक शहराच्या आजूबाजूला शहरीकरण वाढल्यानंतर, स्थानिकांच्या जमिनींचा बळी जातोय. यात त्यांच्या जीवनावर केवढा गंभीर परिणाम होतोय, हे या सिनेमातून मांडलं असल्याचं प्रोमोवरून दिसून येत आहे. (सिनेमाचा प्रोमो पाहा खाली)
चित्रपटाचा प्रोमो पाहून असं वाटतं की, प्रवीण तरडे यांच्या मनात येणारी वास्तवादी कहाणी मांडण्यात ते यशस्वी झाले आहेत. मराठी सिनेमांमध्ये हा सिनेमा काहीसा वेगळा ठरणारा आहे. भूमीपुत्रांच्या न्याय हक्कांविषयीच नाही. तर हे सगळं त्यांच्या जीवावर कसं उठलंय, हे यातून मांडल्याचं दिसतंय.
'मुळशी पॅटर्न' सिनेमाचा जोपर्यंत प्रोमो आला नाही, तोपर्यंत या सिनेमावर टीका होत राहिली. मात्र आता या सिनेमाच्या प्रोमोतून दिसून येतंय, जागतिकीकरणाच्या बदलात जमीन मालक कसे कायमचे रस्त्यावर येतात, त्यांना असं करण्यासाठी कोणत्या प्रकारे भाग पाडलं जातं.
आयटी कंपन्या येतात, अनेकांची करिअर उभी राहतात. पण स्थानिक शेतकऱ्यांपासून त्यांच्या मुलांचं करिअर कायमचं संपतं. अर्थात सिनेमाचं कथानक आणखी कसं आहे? हे फक्त सिनेमाच्या प्रोमोवरून सांगता येणार नाही.
पण निश्चितच हा एक वेगळा विषय आहे, आणि सर्वांनी तो पाहावा, असा सिनेमा असल्याचं 'मुळशी पॅटर्न' सिनेमाचा प्रोमो पाहून वाटतंय.
प्रवीण तरडे या अभिनेत्याने या सिनेमात कथा पटकथा आणि दिग्दर्शनाची भूमिका, भक्कमपणे, पाय रोवून, पार पाडल्याचं सिनेमाचा प्रोमो पाहिल्यानंतर दिसतंय. यामुळे प्रवीण तरडे यांच्या करिअरमध्ये चार चाँद लावणारा हा सिनेमा नक्कीच ठरणार आहे.