प्रवीण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : एखादी कलाकृती स्वत:च्या डोळ्यांनी न पाहता केवळ ऐकीव माहितीवर गोंधळ घालणाऱ्यांची संख्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. मग तो हिंदीतील पद्मावत सिनेमा असो किंवा मराठीत येत असलेला 'न्यूड' असो. प्रदर्शनापूर्वी 'न्यूड' सिनेमावरुन झालेला वाद पाहता सिनेमा पाहिल्यावर विरोध करणाऱ्यांचे तोंड बंद होण्याची वेळ नक्की येणार आहे. कारण सिनेमा संपला तरी विरोध कोणत्या गोष्टीला होत होता हे कळणं कठीण. कला आणि कलाकाराकडे पाहण्याची 'न्यूड' मानसिकता अजूनही सुरूच आहेच हे हा सिनेमा संपता संपता सांगून जातो.
खेडेगावात यमुनाची ही कहाणी. सावळा वर्ण, साधारण तीस-पस्तीशीतल्या वयाची, 'पेहलवान' असलेल्या नवऱ्याच्या दबावाखाली जगणारी, मुलाने (लहान्या) शिकावं यासाठी धडपडणारी यमुना... नवऱ्याला लागलेलं दारु आणि बाईचं व्यसन, विवाहबाह्य संबंधामुळे संसाराकडे होत असलेल्या दुर्लक्षाला कंटाळून 'लहान्या'ला घेऊन मुंबईत येते. मुंबईत राहण्याची सोय तिच्या चंद्रा आत्या (चंद्रा आक्का) कडे होते. इथे यमुनाच्या स्वभावाच्या भिन्न जगणारी चंद्रा आक्का... परिस्थितीला भिडणारी, बिनधास्त स्वभावाची, 'अरे'ला 'का रे?', असं उत्तर देणारी... चंद्रा आक्काने आसरा दिला तरी जगण्याची आणि आपल्या लहान्याला शिकविण्याची ओढ तिला स्वस्थ बसू देत नाही. नव्वदीतला हा काळ... मूळ घरदार सोडून नोकरीच्या शोधात मोठ्या प्रमाणात मुंबईत झालेल स्थलांतर... अचानक वाढलेल्या लोकसंख्येला अपुरा रोजगार... त्यात गिरण्या बंद पडल्याने बेरोजगारांच्या संख्येत पडलेली भर... या सगळ्या स्थित्यंतरात यमुना आपला चरितार्थ चालविण्यासाठी नोकरीच्या शोधात मुंबईत फिरते पण तिला कुठे दाद मिळत नाही. दरम्यान चंद्रा आक्का काय काम करते? या औत्सुक्यापोटी तिच्यामागून जाते आणि तिच कामं पाहून यमुनाला धक्का बसतो. यामागचं कारणही तसचं असतं. शिपायाचं काम करते असं घरी सांगून निघणारी चंद्रा आक्का सर. ज. जी महाविद्यालयात 'न्यूड आर्टीस्ट' म्हणून काम करत असते. (कला महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातल्या विद्यार्थ्यांचा 'न्यूड आर्ट' हा अभ्यासाचा विषय... यामध्ये पेन्टींग, शिल्प साकारण्यासाठी खऱ्या खुऱ्या न्यूड मॉडेल्सची मदत घेतली जाते. नग्नतेशी हा विषय जोडून अनेक ठिकाणी यावर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे आजही 'न्यूड आर्ट'साठी मॉडेल उपलब्ध होणं, हा कला महाविद्यालयांसमोरचा मोठा प्रश्न आहेच) आपल्यावर चितारलेली चित्र, शिल्प यांचं पुढे काय होतं याबद्दल चंद्रा आक्काला काही देणंघेणं नाही. दिवसाला तीनशे रुपये मिळतात हेच तिच्यासाठी महत्त्वाचं.. गावाकडून आलेल्या, आपल्या अब्रुला जिवापेक्षा जास्त जपणाऱ्या यमुनाला हे सहजा-सहजी पचण्यासारखं नाही... दुनियेतल्या माणसांची स्त्रीकडे पाहण्याची नजर आणि इथल्या विद्यार्थ्यांची नजर यातला फरक चंद्रा आक्का तिला सांगते. थोडेफार पैसे मिळतील आणि त्यामध्ये 'लहान्या'चं शिक्षण होईल या हेतूनं यमुनादेखील चंद्रा आक्काप्रमाणं हे काम स्वीकारते... घरामध्ये मोठा होत असलेल्या लहान्याची चित्रकलेची आवड दिवसेंदिवस वाढत असते. त्याची चित्रं पाहता हा एक दिवस मोठा चित्रकार होणार, असं यमुना आणि चंद्रा आक्काला वाटू लागतं. आपला लहान्या चित्रकार होऊन आपण काम करत असलेल्या महाविद्यालयात आला तर? या भितीने त्यांची तगमग सुरू होते. त्यामुळे त्याला औरंगाबादला परत पाठवण्याचा निर्णय होतो.
आता लहान्या मोठा होऊन चित्रकार होतो का? त्याला न्यूड आर्टविषयी केव्हा कळतं? 'न्यूड आर्ट' साठी मॉडेल म्हणून काम करणाऱ्या आपल्या आईविषयी त्याला केव्हा कळतं? त्याची मानसिकता... दरम्यानच्या काळातला यमुनाचा प्रवास हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. एका जेष्ठ चित्रकाराच्या भूमिकेत नसिरुद्दी शाह दिसतात. 'कपडा तो सिर्फ शरीर ढकता है, रुह नही, मैं अपने काम मै रुह देखता हूँ|' असा एक डायलॉग कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन देऊन जातो.
आजच्या घडीलाही राज्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'न्यूड आर्ट'साठी लागणाऱ्या मॉडेल उपलब्ध आहेत. त्यातही त्यांना मिळणार मानधन हे तुटपुंज आहे. कंत्राटी काम असल्यानं नियमित रोजगाराचा प्रश्न आलाच. मग भविष्य निर्वाह निधी वैगेरेचा मुद्दा दूरचं राहिला. समाज म्हणून या कलेकडे बघताना शासन म्हणून या कलाकारांकडेही सन्मानान पाहिलं पाहिजे, हा मुद्दा प्रभावीपण समोरपणे येतो. त्यामुळे एका दबलेल्या आवाजाला 'यमुने'नं वाचा फोडली आहे. एक संवेदनशील, भावनिक विषय हाताळताना दिग्दर्शक रवी जाधवने त्यावेळची आजुबाजुची परिस्थिती, वातावरण जसंच्या तसं उभं केलंय.
अभिनेत्री कल्याणी मुळयेनं यमुनेची तर छाया कदम हिने चंद्रा आक्काची भूमिका साकारली आहे. यमुनेच्या पेहलवान नवऱ्याच्या भूमिकेत श्रीकांत यादव तर लहान्याची भूमिकेत मदन देवधर आहे. अभिनेता ओम भुटकरने यात चित्रकाराची भूमिका साकारली आहे. यासोबत किशोर कदम, नेहा जोशी, नसिरुद्दीन शाह हे कलाकारही सिनेमात दिसतात.
'न्यूड आर्ट'कडे केवळ नग्नता म्हणूनच पाहणाऱ्यांना हा सिनेमा कदाचित रुचणार नाही. पण न्यूड आर्ट , न्यूड आर्टिस्टच वैयक्तिक आयुष्य याविषयी उत्सुकता असा एक वेगळा विषय पाहण्यासाठी हा सिनेमा नक्की बघायला हवा.
रेटींग : ३.५