जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईत कुर्ल्यात लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या आणि वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर बलात्कार कसा झाला हा प्रश्न सर्वांना पडेल, पण ज्या प्रवाशांनी अंधार पडल्यानंतर कुर्ला लोकल स्टेशन ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा चालत प्रवास केला आहे, ते प्रवासी नक्कीच सांगतील, की किती अंधार, किती घाणीचं साम्राज्य, किती असुरक्षितता या रस्त्यावर आजही आहे.
मुंबईत कुर्ला स्टेशन ते लोकमान्य टिळक टर्मिनस हा सर्वात धोकादायक रस्ता आहे. पुरूष प्रवाशाला लुटलं जाण्याची तर महिला प्रवाशाला आपल्यावर अतिप्रसंग होण्याची भीती या भागात वाटली नाही तर नवलच.
विशेष म्हणजे हे अंतर १ किलो मीटरपेक्षाही कमी आहे. पण मध्य रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार या रस्त्यावर चालताना दिसून येतो. पावसाळ्यानंतरही येथे पाण्याचे डबके साचलेले असतात. रस्त्याच्या आजूबाजूला काही ठिकाणी दिवे आहेत, तर काही ठिकाणी दिवे असून बंद आहेत.
या रस्त्यावर रिक्षावाल्यांची दादागिरी असल्यासारखं वातावरण आहे. दादागिरी तयार होण्यास रेल्वे प्रशासनाने मदत केली आहे, असं म्हणता येईल, कारण अंधार पडल्यानंतर या रस्त्याने एकट्याला जाता येईल, असा हा रस्ता नाही. रिक्षा हाच एकमेव पर्याय येथे शिल्लक राहतो. कारण शेअर रिक्षा शिवाय, दुसरी रिक्षा मीटरने येथे जात नाही.
रेल्वे पोलिसांचा तर तुम्हाला येथे मागमूसही दिसून येत नाही. रेल्वे मंत्रालयाने जनतेनेला स्वच्छतेचे कितीही जाहिरातीच्या माध्यमातून डोस दिले असले, तरी येथे प्रचंड घाण असते. रेल्वेला यावर कधीच काही करावंस वाटत नाही.
मध्य रेल्वे किती अस्वच्छ, प्रशासन किती बेशिस्त आहेत, हे पाहायचं असेल, तर कुर्ला लोकल स्टेशनकडून कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसला पायी चालत जा. मुंबईत मध्यभागी एवढा धोकायदायक आणि अस्वच्छ रस्त्यावरून प्रवासी स्टेशन गाठतात, यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.