इंदुरीकरांचं कीर्तन : कोण सुटलंय सांगा?

 हभप इंदुरीकर महाराज माहित नाहीत, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. गावाच्या चौकात

जयवंत पाटील | Updated: Feb 15, 2020, 11:12 PM IST
इंदुरीकरांचं कीर्तन : कोण सुटलंय सांगा? title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई :  हभप इंदुरीकर महाराज माहित नाहीत, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. गावाच्या चौकात चौकात इंदुरीकरांवर चर्चा आहे. तरूण-तरूणी देखील इंदुरीकरांचे चाहते झाले आहेत. टिकटॉकवर तरूणच काय, तर काही तरूणी इंदुरीकरांच्या डायलॉगवर अभिनय करताना दिसतात. इंदुरीकरांनी यूट्यूबवर संताप काढला असला, तरी इंदुरीकरांचा सोशल मीडियावरचा आवाका फार मोठा आहे. एवढा आवाका चांगल्या चांगल्या नेत्या अभिनेत्यांना अजूनही आलेला नाही.

इंदुरीकरांचे एकट्या यूट्यूबवर रोज कमीत कमी ५० लाख लोक व्हिडीओ पाहतात. इंदुरीकरांचा एक व्हिडीओ पाहताना लोक १५-१५ मिनिटं एका व्हिडीओवर चिकटून असतात. इंदुरीकरांची कीर्तन नियमित अपडेट करणारी ४ ते ५ यूट्यूब चॅनेल्स आहेत.

इंदुरीकरांनी त्यांच्या कीर्तनातून वास्तवातली उदाहरणं देणं सुरूच ठेवलं आहे. इंदुरीकरांनी त्यांच्या कीर्तनातून कुणाला सोडलं आहे हे सांगता येणं कठीण आहे.

इंदुरीकरांनी वाईट सासरा, वाईट सासू, सून, बायको, तरूण मुलगा, मुलगी, पुढारी सरपंच, पुढाऱ्यांमागे फिरणारी दिशाहीन तरूण कार्यकर्त्यांची फळी, काही शिक्षक, पत्रकार, मीडिया, भ्रष्ट सरकारी कर्मचारी यासारखी सर्व पात्रं झोडपून काढली आहेत. 

सर्व क्षेत्रात, घरात चांगली वाईट माणसं असतात, आपल्या आजूबाजूला ही पात्र आहेत, आपल्यात आहेत, दुसऱ्यात आहेत, तिच त्यांनी आपल्या कार्यक्रमातून सांगितली.

इंदुरीकर एखादा पेशा, किंवा घरातली सासू-सूनेची, सासऱ्याची भूमिका असणारं पात्र आपल्या कीर्तनातून झोडपतात, तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर आठ्या येतात असं नाही.

तर जे जगात चाललंल, तेच त्यांच्या कीर्तनात सांगतात. सम-विषमचा अनकट व्हिडीओ अजून नीट ऐकण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यावर काही बोलता येणार नाही.

पण इंदुरीकरांनी सर्वांनाच झोडपलंय, गावच्या पाटील देखमुखांनाही इंदुरीकरांनी सोडलेलं नाही, भोंदू कट्टरवाद्यांनाही सोडलं नाही. आरक्षणाच्या दोन्ही बाजूंना त्यांनी कीर्तनात ठोकून काढलंय.

इंदुरीकर वडील आणि मुलीच्या नात्यावरही भरभरून बोलले आहेत. बाप हा विषय मुलीसाठी समजवून सांगताना ज्या कीर्तनातील हजारो लोकांना ते हसवतात, त्यांनाच ते या विषयावर डोळ्यात अश्रू आणण्यास भाग पाडतात.

पण इंदुरीकरांसोबत जो वाद सुरू आहे, तो इंदुरीकर हे नाव मोठं झाल्याचा दाखला आहे, त्यामुळे इंदुरीकरांचे जरी लाखो चाहते असले, तरी थोडी थोडकी म्हटली तरी शेकडो डोकी त्यांच्या वाईटावर बोट ठेवणारी आहेत.

तेव्हा इंदुरीकरांना यापुढे बोलताना संयम ठेवावा लागणार आहे. एखाद्या वाक्याला काय अर्थ लावला जाईल हे सांगता येणार नाही.

अनेक वेळा इंदुरीकरांवर आरोप होतो की ते महिलांच्या विरोधात बोलतात, पण इंदुरीकरांची सर्व कीर्तनं तुम्ही यूट्यूबवर ऐका, ते सर्वंच लोकांच्या वाईट गोष्टींवरही बोलतात आणि नात्यांची भावनिक किनारही कशी जपता येईल ते सांगतात.

मग इंदुरीकरांचं काहीच चुकलं नाही का? असा प्रश्न पडू शकतो, इंदुरीकर जेवढे लोकप्रिय होत आहेत, तेवढंच इंदुरीकरांना आता संयमाने बोलावं लागेल.

इंदुरीकरांचा एक संवाद हा एक कायमचा लोकांच्या मनावर ठश्यासारखा उमटतो, त्यावर टिकटॉक व्हिडीओ होतात. मोबाईलमध्ये कधीही डिलीट न होणारा तो व्हिडीओ होतो. 

वास्तवादी संवाद म्हणून लोकांना पुन्हा पुन्हा तो संवाद कानावर घ्यावासा वाटतो, तेव्हा माऊली आता या पुढे, काय बरोबर, काय चुकीचे, यापेक्षा संयमानेच घ्या.