गणपतचा 'कूक'

 लहानपणी गणपतची परिस्थिती बेताचीच...पण चांगली नोकरी मिळाली आणि त्याचे दिवसच पालटले...! मोठा बंगला, कामाला नोकर चाकर...! परिस्थिती चांगली असल्याने आणि बायको जरा जास्तच 'सुगरण' असल्याने त्याने जेवणासाठी ही खानसामा कामाला घेतला.....! 

Updated: Sep 8, 2017, 05:21 PM IST
 गणपतचा 'कूक'  title=

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड :  लहानपणी गणपतची परिस्थिती बेताचीच...पण चांगली नोकरी मिळाली आणि त्याचे दिवसच पालटले...! मोठा बंगला, कामाला नोकर चाकर...! परिस्थिती चांगली असल्याने आणि बायको जरा जास्तच 'सुगरण' असल्याने त्याने जेवणासाठी ही खानसामा कामाला घेतला.....! 

गणपत लहानपणापासूनच खाण्याचा शौकीन....! मग काय दररोज खानसाम्याकडे नवी फर्माईश....! हैदराबादी बिर्याणी, सिक कबाब, कधी खिमा तर कधी पाया....! कोणता पदार्थ त्याने खायचा ठेवला नाही....! कोणी ही पाहुणा आला की गणपत आवर्जून खानसाम्याला बोलवून घ्यायचा...त्याने जेवण बनवल्याच सांगायचा...! अर्थात चांगल्या जेवणाचे श्रेय खानसामा गणपतच्या बायकोच्या सूचनेला द्यायचा ते त्याचे मोठेपण...! 

किती तरी वर्ष गेली...पंचक्रोशीत गणपत आणि त्याच्या खानसाम्याची चांगलीच लोकप्रियता वाढली...! त्या गावात आलेला कोणताही मोठा नेता असो की अधिकारी गणपतच्या घरी जेवण केल्याशिवाय जात नव्हता...! पण एक दिवस अचानक भूकंप झाला....गणपतने खानसाम्याला कामावरून काढून टाकले...एवढंच नाही तर त्याच्यावर गुन्हा ही दाखल केला....! 

सगळ्या शहरात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली....ज्या खानसाम्याने बनवलेल्या बिर्याणीची, चिकनकरीची चव जिभेवर रेंगाळत होती ती चव परत चाखायला मिळणार नाही या विचाराने गाव हवालदिल झाले...अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी गणपतची भेट घेतली...! पण गणपत काही सांगायला तयार नव्हता...! पण सतत होत असलेल्या प्रश्नांच्या भडीमाराने गणपत हतबल झाला आणि त्याने कारण सांगितलेच....!

 खानसामा घेताना मी स्पष्ट सांगितले होते मला मांसाहारी पदार्थांची मोठी आवड आहे..! तो ही मला म्हणाला की मी ते पदार्थ अत्यंत चांगले बनवतो...! पण त्या दिवशी मी त्याला माझ्या बरोबर जेवायला बसवले..! इतक्या वर्षात पहिल्यांदाच. त्यानेच बनवलेले चिकन मी त्याला खायला दिले...पण काय तो खायलाच तयार नव्हता..! मी खूप आग्रह धरल्यावर त्याने सांगितले मी शाकाहारी आहे..…! सांगताना गणपतचे डोळे संतापाने लाल झाले...! मांसाहारी पदार्थ बनवणारा शाकाहारी...केवढा मोठा गुन्हा...! म्हणून त्याला मी कामावरून काढला...! गणपत ने स्पष्ट केले..! एवढी मोठी गोष्ट लपवल्यामुळे गुन्हा ही दाखल केला...! गणपत संतापून...!

गणपत ने संपूर्ण गावासमोर हा गौप्यस्फोट केल्याने गाव अवाक झाले...पण त्यातून एक जण म्हणाला तो शाकाहारी होता म्हणून काय चिकन वांगे झाले का बिर्याणी खडा पुलाव...तिकडे हा वाद सुरू असताना मी गणपतच्या खानसाम्याला शोधले आणि त्याने बनवलेल्या बिर्याणीवर ताव मारायला सुरुवात केली...!

( या काल्पनिक घटनेचा राज्यातल्या कुठल्याही घटनेशी संबंध नाही...संबंध जुळलाच तर तो योगायोग समजावा..!)