बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम ?

महाराष्ट्रात  बैलपोळा  सण मोठ्या थाटामाटात साजरा...

Updated: Aug 30, 2019, 05:50 PM IST
बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम ? title=

कोमल वावरकर, झी मीडिया, मुंबई : आज बैल पोळा...शहरातल्या अनेक लहानग्यांना हे आश्चर्य़च वाटतं की, बैलांचा देखील सण असतो. पण ग्रामीण भागात बैलांचं महत्व शेतकऱ्यांना आजही आपल्या मुलांएवढंच असतं. कारण अनेक मुलींना सासरी जाताना शेतकरी गाय देखील द्यायचे. गाय मुलीला आंदण म्हणजेच भेट दिली जात असे. ही गाय मुलीकडे सासरी पोहोचवली जायची. अर्थातच अशाच गाईंचे वासरू पुढे मोठे झाल्यावर शेतात कामासाठी जुंपले जातात. नकळत ते शेतकऱ्याच्या परिवाराचा भाग बनतात.

बैलपोळा महाराष्ट्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. आज बळीराजा बैलांना साजश्रृंगार करतात. त्यानंतर बळीराजा पोळ्याच्या कार्यक्रमात भाग घेतो. शेतात बळीराजा आणि बैल ऊन असो वा पाऊस, तरी देखील शेतात राब राब राबतात. जितका कष्ट बळीराजा घेतो तितके कष्ट, बैल देखील शेतात घेतो. श्रावण महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमीनंतर बैलपोळा हा सण येतो. श्रावणात पिठोरी अमावास्या आल्यावर हा सण साजरा केला जातो.

बैलामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे श्रम हलके होतात. आजचा दिवशी बैलाचा सन्मान करण्याचा दिवस असतो, शेतीत आजही बैलामुळे अनेक कामं होतात, जी ट्रॅक्टरने देखील करणे शक्य नाहीत. आज बळीराजा बैलाला सजवतो, विशेष म्हणजे आज बैलाला कोणत्याही कामासाठी जुंपलं जात नाही. कार्यक्रमात ढोल, ताशे वाजवत बैलांची मिरवणूक काढतात. पोळा सण महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा आहे. या सणाच्या दिवशी बैलांचा थाट असतो. आजच्या दिवशी बैलाला कामापासून आराम असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळा या सणाच्या दिवशी बैलांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते.

Farmers

बैलांची मान आणि शरीराचा जोड-खांदा हळद आणि तुपाने तेलानं शेकले जाते. त्यांच्यासाठी रंगबेरंगी वस्त्र बळीराजा आणतो. या दिवशी बैलांना चादरीसारखे आवरण घातलं जाते. संपूर्ण अंगावर नक्षीकाम गेरूचे ठिपक्यानं केलं जातं, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या हार घालतात. पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे, बांधतात. या दिवशी बैलांना खायला गोड पुरणपोळी देखील असते. आज जरी आपण तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे, तरी देखील बैलाचं महत्व बळीराजासाठी आजही कायम आहे. शेतात ट्रॅक्टरचा वापर शेतकरी करतात, मात्र छोटे शेतकरी आज देखील बैलाचा वापर करतात.