ब्लॉग : प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर...

(जशी ट्रेन मधली गर्दी अनुभवसंपन्न करते, तशी प्लॅटफॉर्म वरची गर्दी देखील मूड फ्रेश करते. या गर्दीतही अनेक चेहरे आणि मुखवटे असतात. ते बघताना खूप गोष्टींचं आकलन करता येतं. तर काही समजन्यापलीकडच्या वाटतात. अशाच काही गोष्टी तुमच्या सोबत शेअर करत आहेत झी 24 तासाच्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर)

सुवर्णा धानोरकर | Updated: Mar 22, 2019, 05:51 PM IST
ब्लॉग : प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर...  title=

सुवर्णा धानोरकर, मुंबई : प्रत्येक स्टेशनवर उद्घोषणा ऐकू येते. यासाठी प्रत्येकाचे कान टवकारलेले असतात. आपल्या प्रिय व्यक्तीचा आवाज ऐकायला जेवढी आतुरता नसेल, तेवढी आतुरता या आवाजासाठी असते. मध्यंतरी हा गोड आवाज कुणाचा, याची पोस्ट वाचली होती फेसबुकवर. या गोड आवाजानं सगळ्याच फलाटांवर पळापळ सुरू होते. इकते-तिकडे लोकं पळत असतात. पण या उद्घोषणेआधी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त प्रश्न असतो. ट्रेन कधी येईल? याच प्लॅटफॉर्मला येईल ना ? तिकडे तीनवर नको यायला ! धावायला लागेल. आज एकतर डब्यात ग्रेव्हीवाली भाजी आहे आणि ड्रेसचा कलर पण लाईट आहे. जर पळता पळता डब्यातली भाजी सांडली तर?  अरे बापरे! असे विचार मला कोही लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात. मध्येच एखादा व्यक्ती डोक्यावर भलामोठा भार घेऊन चालत-वजा पळत असतो. गर्दीतून वाट काढत मळकट लाल गुलाबीसर गमछा खांद्यावर, गर्दीतून वाट काढत आपल्या डोक्यावरचा भार कुणाला त्रासदायक ठरू नये आणि प्रवाशांमुळे आपल्यालाही धक्का लागू नये यासाठीचे त्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसतात. खरंतर तोही या गर्दीला आणि गर्दीतून वाट काढण्याला सरावलेला असतो. यात विशेष असतात ते पाणीपुरीच्या पुऱ्या घेऊन जाणारे लोकं. मोठी टोपली डोक्यावर घेऊन त्या पुऱ्यांभोवती लाल कपडा बांधून गर्दीतून ते वाट काढतात. सोबतच मासे घेऊन जाणाऱ्या कोळी महिला. आंबाड्यावर माळलेली सुंदर फुलं किंवा गजरे. मासळीसोबत त्यांच्या गजऱ्यांचा सुवास आणि विशिष्ट पद्धतीनं बोलत असतानाचा आवाज यामुळे तिथलं वातावरण आणखी जिवंत वाटतं. त्यांचं बोलणं जितकं कलरफुल्ल तितकेच त्यांचे कपडे कलरफुल. थ्रीफोर्थ स्लिव्हजचं ब्लाऊज त्याला कॉन्ट्रास्ट फ्लोरल फ्रिंटची नऊवारी. मस्त मोठी आणि लालभडक टिकली. चालण्यातली विशिष्ट लकब... जशी वातावरण प्रफुल्लीत करणारीच. 

बोरीवली स्टेशनवर या गर्दीत एक सत्तरी गाठलेले आजोबा नेहमी दिसतात. ग्रीन कलरच टीशर्ट आणि स्काय ब्लु जीन्स, थोडे झुकलेले खांदे, डोक्यावर जेमतेम उरलेली चांदी. मधेच एखाद्या घोळक्यापुढे थांबतात आणि गुड मॉर्निंग विश करून पुढे जातात. कोण हा माणूस हे कळायच्या आत पुन्हा तेच होतं. मग सगळ्यांचीच ट्यूब पेटते. अरे या आजोबांचं मानसिक स्वास्थ थोडं बिघडलंय. सकाळच्यावेळी कॉलेजला जाणाऱ्या मुली असतात. हिवाळा असेल तर उशिरा उजेड होत असल्यानं हमखास आई किंवा बाबा त्यांना सोडायला येतात. मुलगी ट्रेनमध्ये बसेपर्यंत त्यांच्या गप्पा सुरू असतात. ट्रेन आली की आई/बाबा टाटा बायबाय करून निघणार. गर्दी आणखी कमी होते. मुलीला ट्रेनमध्ये बसवून जाणाऱ्या बापाच्या चेहऱ्यावर मग स्वत:ची घाईगडबड दिसते. आता घरी जाऊन कुठलं काम आधी उरकायचं, मग झटपट आवरून रोजची ठराविक ट्रेन पकडायची आणि ऑफिसला निघायचं हे सगळं कसं फास्ट फॉर्वर्डमध्ये चेहऱ्यावरून जाताना दिसतं. 

एखादं कुटुंब गावाला जायला निघालेलं असतं लहान मुलं असेल तर ते बिचारं पेंगुळलेलं असतं. आईच्या खांद्यावर मान टाकून झोपेत गर्दी न्याहाळत राहतं. बाबा आपलं ओझं घेऊन बॅगा सांभाळत कुठल्या प्लॅटफॉर्मवर जावं यासाठी विचार करत उभे असतात. शाळेत जाणाऱ्या शिक्षिका साड्या, बॅगा सांभाळत असतात. परीक्षेचा काळ असला की एखादीच्या हातात पेपरच्या गठ्ठ्याची पिशवी दिसते. काहीजणी फोनवर बोलत ट्रेनची वाट पाहत असतात. तेवढ्या वेळात एका हातानं केसांच्या बटांशी खेळ सुरुच असतो. या मुंबईतल्या मुलींची एक खासियत आहे. इथे तुम्हाला शॉर्ट हेअरमधल्या मुली फार कमी दिसतील. इथल्या मुली वेस्टर्न अटायरमध्ये जरी असल्या तरी केस मात्र लांब असतात. फक्त लांब नाही तर ते मोकळेसुद्धा असतात. फार कमी मुली किंवा महिला या गर्दीत अशा दिसतील की ज्यांनी केस बांधलेले असतील. इथल्या दमट घामट वातावरणातही या मुली मोकळे केस छान कॅरी करतात. ते त्यांनाच जमावं जणू. काही मुलींचा कॉन्फिडन्स इतका जबरदस्त की या लांबसडक केसांना हिरवा, जांभळा रंग देऊन फॅशनेबल लूक देतात. लांब मोकळे केस हे जणू मुंबईकर मुलीचं स्टाईल स्टेटमेंटच असतात.

एक घोळका असाही असतो की ज्यांना वाटतं की प्लॅटफॉर्मच्या काठाला उभी राहिले/ उभा राहिलो तर ट्रेन लवकर येईल. हे लोकं फारच निवांत असतात पण दिखावा असा की मला उशीर झालाय. ट्रेन पण लेट आहे. काय करु मी आता. सतत त्या प्लॅटफॉर्मवरून वाकून वाकून ट्रेनच्या दिशेनं बघायचं, लगेच मनगटावर घड्याळ बघायचं, मग इंडिकेटर बघायचं. असा त्यांचा पुढच्या तीन चार सेकंदांचा खेळ. मला तो बघायला आवडतो. काही लोकं असे असतात की मागाहून येऊन त्यांना सर्वात पुढे जाऊन उभं राहायचं असतं. त्यात त्यांना यशही येतं. वाट्टेल तो आटापिटा करून प्लॅटफॉर्मच्या काठाला जाऊन उभे राहतात. ट्रेन येताना दिसली की हे युद्धासाठी जातोय अशा आविर्भावात तयारी करतात. पण खरी तयारी असते ट्रेनमध्ये सर्वात आधी चढून मनपसंत जागा पकडण्यासाठी. याच गर्दीत काही ग्रुप असतात. बायकांचे किंवा पुरुषांचेही. गप्पा नेहमीच्याच. महिलांमध्ये, आज कसा उशीर झाला याच्या गप्पा रंगतात. तर पुरुषांमध्ये आजच्या ताज्या विषयावर गप्पा रंगतात. त्यासाठी विषयाचं बंधन नसतं. ट्रेन यायला लागली की या गर्दीतल्या हालचाली वाढतात. लगबग वाढते. येवढ्या घाईतही कुणाचं तरी लक्ष त्या ब्रीजवरच्या पायऱ्यांवर असतं सोबतचं कुणीतरी यायला उशीर झालेला असतो. मग त्याला /तिला फोन करायचा 'यार किधर है तू?  ट्रेन आयेगी अभी.' पलिकडून उत्तर येणार मग इकडून ठिकाण सांगितलं जातं. 'मिडलमे खडी हू फर्स्टक्लासके पास हूं/ लास्टमे हूं...' असंच काहीस संभाषण. 

गाडी येईपर्यंत आजुबाजुला उगाच नजर टाकणारेही असतात माझ्यासारखे. आणि अशा वेळी तुम्ही जर ब्रीजवर असाल तर तुम्हाला या सगळ्याच्या हालाचाली छान टिपता येतात. कसलीही घाई नसणारेही लोकं दिसतील. मग उगाच टंगळमंगळ करणारे लोक एखाद्या स्टॉलसमोर उभे राहून पोटपूजा करतात. वडापाव सामोसे खात तृप्त होतात. काही घाईगडबडीत घरी ज्युस घेणं शक्य झालं नाही म्हणून स्टेशनच्या स्टॉलवर हे काम इमानेइतबारे करताना दिसतात. तमाम स्टेशनांच्या या स्टॉल्सवर तुमच्या माझ्या आवडीच्या वेफर्स, मूग डाळ, मसाला शेंगदाणा, चीझ बॉल्स, भेळ, अश्या पाकिटांची तोरणं लागलेली दिसतात. कुणीतरी नुसतंच ही रंगीबेरंगी पाकिटं न्याहाळताना दिसेल. कुणी ती पाकिटं पाहून तोंडातलं पाणी तोंडातच ठेवायचा प्रयत्न करेल, उगाच मग वाढलेल्या पोटाकडे पाहिलं. कशाला डायटिंग करायची असा विचारही या व्यक्तिच्या मनात त्यावेळी येतो. पण कसोशीनं मनाला आवर घालण्यात या गुबगुबीत व्यक्तीला यश येतं.

त्याचवेळी त्या दणकट व्यक्तीला पाहत उभी असणारी व्यक्ती असते आणि चेहऱ्यावर एक भीती दिसते 'भयंकर आहे, देवा ! मला नको हा एवढं जाड करु कधी.' (बरं हे विचार करणाऱ्या काहींच्या हातात त्यावेळी याच पाकीटबंद पदार्थांचा ताबा असतो.) काय विरोधाभास, जे खाऊन जाड होणार, तेच हातात घेऊन मला जाड करू नको म्हणून देवाला आर्जव करायचं. ऑफिसला जायची कितीही घाई असली तरी या फावल्या वेळात असे विचार वाचायला मज्जा येते. उलट मला तर हा वेळ फावला वाटतच नाही. ऑफिसचं काम सुरु करण्याआधी ही मस्त सुरूवात. एकटे लोकलची वाट पाहत उभे असलात तर ही वेळ हक्काची. मस्त एन्जॉय करता येते या वेळेत. काहीजण उगाच त्या स्टॉलवरच्या पिवळ्या, ऑफ व्हाईट आणि सब्जा घातलेल्या गुलाबी सरबतच्या त्या चौकोनी मशीनकडे बघण्यात व्यस्त असतात. ते घुसळणार सरबत पाहून त्यात आपले सगळे टेन्शनही फिरवत असतात. टेन्शन घुसळून शांत होतात. तेवढ्यात गाडीची उद्घोषणा. 'प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली गाडी xxxला जाणारी धीमी लोकल आहे.' मग पटकन स्वारी तयारीत. आला डबा जवळ की झडप घालायची आणि जागा मिळेल तिथे बसायचं हा विचार पुन्हा एकदा स्वतःला सांगतात. कारण त्यानंतर या सगळया क्रिया इतक्या झटपट करायच्या असतात की जरा अंदाज चुकला तर गेलीच सीट. मग तंगडतोड करत उभ्यानं ऑफिसला जावं लागणार. लोकल येताच ही रंगीबेरंगी विचारांची गर्दी चुटकीसरशी गायब होते. 

लोकलच्या दरवाज्यातून गुडूप. मग त्या छोट्या छोट्या दरवाज्यात दहा पंधरा डोकी, वीसबावीस हात आणि तीस-चाळीस पाय दिसत राहतात. लोकल पुढच्या प्रवासाला निघते, लाखो विचारांची, जगभराचं टेन्शन घेतलेली गर्दी घेऊन. प्लॅटफॉर्मवर मग पुन्हा काही क्षण शांतता. स्टॉल्सवरची गर्दी कमी. पण तिथल्या काम करणाऱ्या माणसांची लगबग सुरूच असते. मधेच कुणीतरी त्या स्टॉलवाल्याला लेडीज डबा इधरही आयेगा क्या असं विचारतं किंवा मग अशाच प्रकारचा प्रश्न विचारून खात्री करून घेताना दिसतात. असे नवखे लोकं किंवा कुणीही या स्टॉलवर येताना दिसले की जेवढे प्रफुल्लित हे चेहरे दिसतील त्यापेक्षा जास्त प्रसन्नता तिथे लटकणाऱ्या पाकिटांवर दिसते. आता कुणीतरी आपल्याला घेणार मग आपला (पाकिटाची) चरचर कचकच आवाज होणार त्याला कुणी दातानं फोडणार, कुणी लीलया उघडणार आणि कुरर्म कुरर्म करत खाऊ खाणार. पण होतं भलतंच. प्रश्न विचारून ती व्यक्ती निघून जाते. पाकिटांची तोरणं पुन्हा कुणी येतंय का दुकानाच्या दिशेने म्हणून वाट पाहत लटकत असतात. मध्येच एखादा घोळका दिसतो, निरखून पाहिलं की दिसतं. टीसीन सावज गाठलं म्हणून काही लोकं हसतात तर ज्यांच्याकडे पास/ तिकीट नाही त्यांची पळापळ सुरू होते. कुणीतरी माझी ट्रेन कधी येईल म्हणू सतत घड्याळ आणि प्लॅटफॉर्मवरच इंडिकेटर बघत वेडंवाकडं तोंड करत असतो. इंडिकेटर वरची वेळ जसजशी कमी होते तसतशी गर्दी वाढायला लागते. पुन्हा तीच लगबग, त्याच गप्पा, तसेच घोळके आणि तीच कचकच चरचर वाजणारी वेफर्सची पाकीट.

दुपारच्या गर्दीत जरा निवांतपणा दिसतो. जेवल्यानंतर पेंगळलेल्या डोळ्यांनी ऑफिसला निघालेले लोकं दिसतात. कुणी हाफ डे घरी जाणारं, फिरायला जाणारं किंवा कामानिमित्त हाफ डे घेऊन जाणारं दिसेल. कुणी भल्या पहाटेच शिफ्ट करून घरी जाताना झोपळलेला चेहरा घेऊन ट्रेनची वाट पाहत दिसेल. एखादी भाजीवाली पण दिसते निवांत बसलेली एखाद्या बाकड्याच्या बाजूला. कुणीतरी ट्रेन येईपर्यंत तिच्याकडून आलं, मक्याचे दाणे, लिंबू किंवा असेलच तर फळं घेत असतं. भाव करत असतं. कुणी बाकड्यावर बसून हे संभाषण ऐकतात. कुणी त्यात सहभाग घेतात. तर कुणी त्याच बाकड्यावर बसूनही मोबाइल विश्वात गुंग. 

कुठल्याही वेळेला गेलात तर प्लॅटफॉर्मवर असेही लोकं दिसतात की जे फक्त बाकड्यावर बसून असतात. त्यांचा चेहरा वाचायचा कितीही प्रयत्न केलात तरी काहीच थांगपत्ता लागत नाही. त्यांना ट्रेनमध्ये बसायचंय की नाही पासून ते ते इथे कशाला बसलेत इथपर्यंत मनात प्रश्न येतात. किती ट्रेन येतील जातील ते तिथेच बाकड्यावर बसलेले. डावीकडे बघ उजवीकडे बघ. 

संध्याकाळीही हे प्लॅटफॉर्म तुडुंब भरलेले. बाजूला मान हलवलीत तरी शेजाऱ्याचा गालावर तुमचं तोंड आपटायची भीती अशा गर्दीत थकलेल्या चेहऱ्यावर वेगळंच तेज असतं. घरी पोहोचण्याची ओढ असते. पुढच्या कामाची यादी झटपट मनात करणं सुरू असतं आणि स्टेशनवरून हळूहळू बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू असते. मध्येच कुणाचा तरी पाय पायावर पडतो आणि एखादा विव्हळतो. गर्दीत सोबतच कुणीतरी हात सुटल्यानं पाय उंच करून सोबत्याला शोधत असतो आणि अशात मग एखाद्या जगाला वैतागलेल्याच्या शिव्याही खातो. अरे इतनी भीड में क्यू इधर रुकते हो तुम लोग? साईड मे खडा रहने का ना... बिचारी व्यक्ती याआधीच टेन्शनमध्ये त्यात हे ऐकून अजून त्रागा. या मुंग्या बाहेर पडल्या की प्लॅटफॉर्म ओस पडतो. पुढच्या ट्रेनची वाट पाहत आणि गर्दीसाठी असुसतो.

याचवेळी कुणी लव्ह बर्डस जात असतील तर मुलगा, मुलीला कुणाचा धक्का लागू नये याची काळजी घेत असतो. 'मी किती ग्रेट आहे, हिची काळजी जगात मी एकटाच घेऊ शकतो.' असा त्याचा चेहरा दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरचं हे अत्युच्च, ग्रेट, फन्टास्टिक फिलिंग पाहून आजूबाजूचे तिशी गाठलेले मनातल्या मनात त्या नुकतंच मिसरूड फुटलेल्या स्वप्नाळू पोराला शिव्या हसडतात किंवा स्वतःचं त्या काळातल प्रेम आठवत गर्दीतून नाहीसे होतात. कुणी काका आजोबा वयाचे असतील या लव्ह बर्डच्या बाजूला तर ते फारच रागात बघतात. पण अशावेळी प्लॅटफॉर्म सुखावत असतो. लव्ह बर्डस जाताना थंड हवेची झुळूक आपल्यावरून गेल्याची जाणीव त्याला होते. पुन्हा अशाच एखाद्या लव्ह बर्डसची तो वाट बघत राहतो. त्याला नेहमीच अशी स्वप्नाळू आणि आशावादी गर्दी हवीहवीशी वाटत असते.

क्रमशः