दक्षता ठसाळे, झी २४ तास, मुंबई : भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) रुग्णालयात अतिदक्षता विभागाला (ICU) लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा जीव गेला.... (10 Babies killed in fire) हा मृत्यू फक्त त्या १० मुलांचा नाही तर १० आईंचा देखील आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे १० आई मातृत्वाच्या उंबरठ्यावरच उभ्या राहिल्या. (Dakshata Thasale blog on Bhandara 10 Babies killed in fire)
एक स्त्री फक्त बाळाच्या जन्मानंतरच आई होते; असं नसतं. प्रत्येक स्त्रीमध्ये आईपण असतं. फक्त गर्भ तिच्या उदरात राहिल्यावर ते आईपण फुलतं असतं. बाळासोबतच आई देखील नव्याने जन्म घेत असते. ९ महिने ९ दिवस आपल्या गर्भात बाळाला सांभाळणारी आई देखील वाढत असते.
त्या ९ महिने ९ दिवसांत तिने बाळाशी साधलेला संवाद. त्याच्यासोबत पाहिलेली स्वप्न ही सगळी त्या आगीत राख होऊन गेली. बाळाच्या गोडबातमीनेच संपूर्ण कुटूंब आनंदाने न्हाऊन निघतं. बाळाच्या येण्याची तयारी प्रत्येक जण करत असतं. आई गर्भात बाळ वाढवत असते तिची तयारी त्या पद्धतीने सुरू होते. तर बाप त्याच्या विचारात बाळाला वाढवत असतो तो त्याच्या परीने झटत असतो. पण या घटनेने आई आणि बाप या दोघांचं मातृत्व हिरावून घेतलं आहे.
बाळाला जन्म देऊन आई कुठे थोडीशी सुखावली होती. बाळ आईच्या कुशीत नाही पण मंदिर समजल्या जाणाऱ्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात सुखरुप आहे असं वाटतं होतं. पण रात्रीच्या गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं. या आगीत १० चिमुकल्या जीवांनी आपला जीव गमावला. सरकारने भरपाई म्हणून पीडित मातांना ५ लाखाचा चेक देऊ केला. पण हा चेक त्या मातेच्या जखमेवर फुंकर घालू शकेल का? हा एकच सवाल आहे.
घडलेल्या घटनेची चौकशी होईल, त्याबाबत तपास केला जाईल. दोषी असणाऱ्यांवर कारवाई देखील होईल. पण ती आई आपली दुःख विसरू शकेल का? तिने बाळासोबत पाहिलेली स्वप्नांच आता काय होईल? तिच्या कुशीत बाळाची उब नसेल.... बाळाच्या आठवणीने पुन्हा पान्हा फुटेल....या साऱ्या गोष्टींना जबाबदार कोण?
काळ हाच सगळ्यावर उपाय असतो असं म्हणतं नातेवाईक त्या आईला समजवतील. पण खरंच काळाच्या ओघात हा मनावर झालेला आघात ती विसरू शकेल का? ९ महिने ९ दिवस गर्भात बाळ घेऊन फिरताना ती जिथे जिथे गेली ती आठवण तीला स्वस्त बसू देईल का? त्या रुग्णालयासमोरून जाताना बाळाची आठवण तिला बैचेन करेल का?
बाळाच्या जाण्याने 'एकटी' पडलेली आई खरंच यातून सावरेल का? 'एकटी एकटी घाबरलीस ना....' गाणं कानावर पडताच चाचपडून पाहिल का?