कोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दुध संघाने म्हैस आणि गाय दुधाच्या विक्रीत दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे कोल्हापूरात म्हैस दूध प्रतिलिटर ५० रुपयाला मिळणारं दूध आत्ता ५२ रुपयाला तर मुंबईच्या ग्राहकांना ५४ रुपयाला मिळणारं दूध ५६ रुपये प्रती लिटरने मिळतंय. या निर्णयामुळे ग्रहाकाच्या खिशाला दोन रुपयांचा भार अधिक वाढलाय.
गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेन आंदोलन केलं. या आंदोलनामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पाच रुपये अनुदान न जमा करता गाईच्या दुधाचा किमान दर २५ रुपये निश्चित केला. त्याचबरोबर दुधाची पावडर निर्मिती करणाऱ्या संघाना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
२१ जुलैपासून दरवाढीची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर बहुतांश दुध संघाने त्यानुसार दर वाढ केली. दूध खरेदी दरात वाढ झाल्याने गाईच्या विक्री दरातही वाढ होणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र गोकुळ दूध संघाने म्हैशीच्या दूध खरेदी आणि विक्री दरातही दोन रुपयांची वाढ केलीय.