उत्तर प्रदेश सरकार राज्यातल्या खेळाडूंचा आदर करत आहे. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी सरकार रोख बक्षिसे आणि सरकारी नोकऱ्या यांसारखे प्रोत्साहन देत आहे.
योगी सरकारच्या या प्रयत्नांमुळे मेरठ जिल्ह्यातील पारुल चौधरीचे बालपणीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पारुल चौधरीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस उपअधीक्षक नियुक्तीचे पत्र दिलं आहे.
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या पारुल चौधरीला 4.50 कोटी रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम तसेच पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
पारुल चौधरीने आशियाई क्रीडा स्पर्धेत 5 हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक आणि 3 हजार मीटर स्टीपल चेसमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
पारुल चौधरीने शेवटच्या लॅपमध्ये ती जपानच्या रिरिका हिरोनाकापेक्षा पिछाडीवर होती, पण शेवटच्या चाळीस मीटरमध्ये तिने तिला मागे टाकले आणि 15 मिनिटे 14.75 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले.
या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पारुल ही पहिली भारतीय महिला ठरली. गोल्डन गर्ल आणि फ्लाइंग परी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारुलचे आयुष्य संघर्षांनी भरलेले आहे.
पारुल चौधरीच्या वडिलांनी सांगितले की, मुलीने खूप संघर्ष केला आहे. पारुलने जेव्हा खेळ सुरू केला तेव्हा ती गावातल्याच मोडकळीस आलेल्या रस्त्यांवर धावण्याचा सराव करायची.