भाजपकडून जाहीर झालेल्या 20 उमेदवारांच्या यादीत 5 महिला उमेदवारांना तिकीट मिळालं आहे.
नंदूरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गावित यांच्या उमेदवारीला मित्र पक्षाबरोबरच भाजपमध्येही विरोध होता. मात्र, दिल्लीतून त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आलाय.
गेल्यावेळी हुकलेली संधी यावेळेला स्मिता वाघ यांच्यासाठी चालून आली. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या.
रावेरमध्ये रक्षा खडसे यांची उमेदवारी कापली जाईल अशी एक चर्चा होती. परंतू रक्षाताई खडसे यांना पर्याय कोण? याचं उत्तर भाजपला मिळू शकलं नाही अन् रक्षा खडसे यांना अपेक्षेप्रमाणे तिकीट मिळालं.
दिंडोरी लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे जाणार का? असा सवाल विचारला जात होता. मात्र, भाजपने भारती पवार यांना उमेदवारी देऊन गुंता सोडवला आहे.
बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन भाजपने पंकजांचा वनवास संपवला आहे. प्रीतम मुंडे यांना बाजूला सारून भाजपने पंकजांना बळ दिलंय.