रात्रीच्यावेळी भीतीने अचानक जाग येणे, घाम फुटणे , हृदयाचे ठोके जलद होणे ही काही सामान्य भीतीदायक लक्षणे आपल्याला माहितच आहेत.
अनेकदा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो पण तुम्हाला माहित आहे का ही भीतीदायक स्वप्न तुमच्या आरोग्याविषयीचे धोक्याचे संकेत असू शकतात. नुकताच झालेल्या एका संशोधनानुसार ही बाब समोर आली आहे.
केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि कॉलेज लंडनने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार भयानक स्वप्न आणि भ्रम ही ल्युपस आणि संधिवाताची लक्षणं असू शकतात.
या अभ्यासात 400 डॉक्टरांनी सर्वेक्षण केलं आणि 800 रुग्णांच्या मुलाखती घेतल्या तर त्यात असे आढळून आले की वाईट स्वप्न पडण्याची अनेक कारणं असू शकतात जसे की दारू, औषधे, ताण.
मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. रितेश गुजर यांच्या मते जेव्हा शरीरात जळजळ होते, तेव्हा ते संतुलित करण्यासाठी सायटोकाइन REM हार्मोन मदत करतो ज्यामुळे झोप लागत नाही आणि त्याचा परिणाम मेंदूवर होतो.
REM स्लिप हा एक टप्पा आहे ज्यामध्ये बहुतेक स्वप्न पडतात. बऱ्याचवेळा स्वयंप्रतिकार रोगांमुळे भयानक स्वप्ने पडतात, ज्यामुळे लोकांना असे वाटू शकते की त्यांच्यावर हल्ला होत आहे किंवा ते संकटात अडकले आहेत आणि मदत करण्यास असमर्थ आहेत.
डॉक्टरांच्या मते ही स्वप्ने ल्युपस, संधिवात, स्जोग्रेन्स, संधिवात आणि सिस्टेमिक स्क्लेरोसिस यांसारख्या रोगांची लक्षणे असू शकतात.
यावर मात करण्यासाठी डॉ.रितेश गुजर यांनी झोपण्याच्या एक तास आधी योगासनं आणि हलक्या अन्नाचे सेवन करावं असं सांगितलंय. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)