संजय राऊत यांचा भाजपवर मोठा आरोप.. म्हणाले एमआयएम म्हणजे

महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे आणि तीन पक्षाचेच सरकार राहील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

Updated: Mar 19, 2022, 12:06 PM IST
संजय राऊत यांचा भाजपवर मोठा आरोप.. म्हणाले एमआयएम म्हणजे title=

मुंबई : एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे. ते तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिले आहे, बंगालमध्ये पाहिले आहे. त्यामुळे एमआयएम पक्ष भारतीय जनता पक्ष सोबत काम करत आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय.

जालना येथे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांची एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान इम्तियाज जलील यांनी आघाडी सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. या चर्चेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे एमआयएमचा निरोप पोहचवण्यात येणार आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मानणारे पक्ष आहेत. परंतु, एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. ते शिवसेनेचा आदर्श होऊ शकत नाही.

एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे. ते तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये, बंगालमध्ये पाहिले आहे. हा पक्ष आधीच भारतीय जनता पक्ष सोबत काम करत आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध होऊ शकत नाही. ते 'बी टीम'च आहेत, असा आरोप त्यांनी भाजपवर केला. 

औरंगजेबाच्या कबरी पुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे कधीच आदर्श होऊ शकत नाही. ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हात मिळवणी आहे ती त्यांनाच लखलाभ ठरो, अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली.