इटलीच्या वेस्पा कंपनीनं भारतात नुकतीच एक नवीकोरी स्कूटर लाँच केली आहे. Vespa Dragon असं या स्कूटरचं नाव. ही कंपनीची एक एक्सक्लूझिव्ह कलेक्टर एडिशन मॉडेल आहे.
हाँगकाँगच्या लूनर इयरच्या निमित्तानं ही स्कूटर लाँच करण्यात आली. जगभरात या स्कूटरचे अवघे 1888 युनिट विकले जाणार असून, त्यातील काही मॉडेल भारतात लाँच केले जातील.
या स्कूटरच्या दरात तुम्ही 5 सेडान कार, किंवा मग एक एसयुव्ही खरेदी करु शकाल. या स्कूटरची एक्स शोरुम किंमत आहे 14.27 लाख रुपये.
सुरेख सोनेरी रंगाच्या या स्कूटरवर हिरव्या रंगात ड्रॅगनचे ग्राफिक्स साकारण्यात आले आहेत. फ्रंट एप्रनपासून साईड पॅनलपर्यंत हे ग्राफिक्स पाहायला मिळतात.
155 सीसी इतकी क्षमता असणाऱ्या या स्कूटरला स्टील प्लेट मोनॅक्यू फ्रेम देण्यात आली आहे. फ्रंट सिंग आर्म शॉक अब्जॉर्बर आणि मागच्या बाजूला प्री लोडेड अॅडजस्टेबल सस्पेंशन या स्कूटरमध्ये देण्यात आले आहेत.
वेस्पाच्या या स्कूटरची अधिकृत बुकिंग सुरु करण्यात आली असून, कंपनीच्या मोटोप्लेक्स डीलरशिपच्या माध्यमातून ती बुक करता येऊ शकते.
इटलीमध्ये डिझाईन आणि डेव्हलप करण्यात आलेल्या या स्कूटरला भारतीय बाजारात नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ही स्कूटर खरेदी करणाऱ्यांना कंपनीकडून वर्सिटी जॅकेटही दिलं जाणार असून, स्कूटरवर दिसणारे ड्रॅगन या जॅकेटवरही दिसत आहेत.