मुंबईच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक फुटपाथवर ठराविक अंतरावर चर्रर्र करत तेलाच्या कढईत तळले जाणारे वडे अन् त्याचा घमघमाट प्रत्येक मुंबईकराला मोहात पाडतो. वडापाव आवडत नाही असा मुंबईकर फार क्वचितच आढळेल.
पण मुंबईकरांच्या या लाडक्या वडापावची सुरुवात कोणी आणि कधी केली? वडापावच्या जन्माची कहाणी फारच रंजक आहे. आज लाखो कष्टकारांच्या पोटाची खळगी भरणारा हा पदार्थ मुंबईची ओळख बनला आहे.
वडापावची सुरुवात 1966 साली अशोक वैद्य यांनी केल्याचं बोललं जातं. मुंबईतल्या दादर स्टेशनबाहेर अशोक वैद्य यांचा एक फूड स्टार होता. या स्टॉलवर बटाट्याची भाजी आणि चपाती मिळायची.
ग्राहकांना काही तरी वेगळं द्यायचं असं ठरवून अशोक वैद्य यांनी बटाट्याची भाजी बेसनाच्या पिठात बुडून तो तळला आणि त्याबरोबर ग्राहकांना चपातीऐवजी पाव दिले. हा पदार्थ ग्राहकांना प्रचंड आवडला.
स्वस्त आणि चवीला रुचकर असा वडापाव खाऊन लोकांचं पोटही भरू लागलं. कष्टकरी समाजाला जेवणाऐवजी पोट भरण्याचा एक पर्याय मिळाला. 80 च्या दशकात वडापाव अनेकांच्या उपजिविकेचं साधन बनला
याच काळात मुंबईतल्या अनेक मिलना घरघर लागली. मुंबईतल्या गिरणी कामगारांची वाताहत होण्यास सुरूवात झाली त्यावेळी, अनेक गिरणी कामगारांनी नाक्या-नाक्यावर वडापावचे ठेले सुरू केले
अशोक वैद्य यांचे दोन भाऊ विकलांग होते, आयटीआयमधून इंजिनिअरिंग केल्यानंतरही वैद्य यांना नोकरी नव्हती, वडिलांची मिल बंद पडली. त्यामुळे पोट भरण्यासाठी अशैक वैद्य यांनी फूड स्टॉल सुरु केला.
वडापावची सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला वैद यांना कुटुंबातून विरोध झाला. पण लोकांना स्वस्तात चांगला पदार्थ मिळत असल्याने अशोक वैद्य यांनी कुटुंबाचा विरोध न जुमानता व्यवसाय सुरु केला आणि तो वाढवला.
1978 साली एक वडपाव 25 पैशाला मिळत होता, आज याच वडापावची किंमत पंधरा ते तीस रुपये इतकी झाली आहे. केवळ कष्टकरी-गोर गरीब लोकांसाठीच नाही तर आज क्रिकेटर्स, अभिनेते, राजकारणी प्रत्येकाला याची भूरळ आहे.
मुंबईत आज अशी अनेक ठिकाणं आहेत जिथले वडापाव प्रसिद्ध आहेत. तिथला वडापाव खाण्यासाठी लोकांच्या अक्षरशा रांगा लागतात. त्यामुळे अशोक वैद्य यांचं योगदान विसरता येणं शक्य नाही.