उन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या
शहरी धकाधकीपासून दूर निसर्गाच्या सानिध्ध्यात पोहोचण्याची शोधत अनेकांचेच पाय माथेरानच्या दिशेनं वळतात. पण, थंड हवेचे ठिकाण असलेल्या याच माथेरान मध्ये मागील दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाला आहे.
ऐन पर्यटन हंगामात विजेचा खेळ खंडोबा झाल्याने माथेरानकर आणि पर्यटक बेजार झाले आहेत. मागील तीन चार दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
परिणामी माथेरानमध्ये पिण्याच्या पाण्याचा खडखडाट झाला असून वापराला देखील पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिकांसोबतच पर्यटकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
जनरेटर आणलेले डिझेल देखील संपले आहेत. वारंवार फोन करून देखील महावितरण कडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत.
सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने माथेरान मध्ये आले आहेत मात्र विजेअभावी त्यांचे हाल होत आहेत. आता ही परिस्थिती सुधारण्याचीच प्रतीक्षा अनेकांना लागली असून, पावसाळ्याच्या सुरुवातीवर येथील अनेक दुरुस्तीकामांना वेग आला आहे.
दरम्यान, माथेरामध्ये मान्सूनच्या दिवसांमध्येही पर्यटकांचा वाढता ओघ पाहता सर्व अडचणींचं निवारण करण्यासाठीचे प्रयत्न सुरु असून येथील परिस्थिती नियंत्रणात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.