रोटी म्हणा, भाकरी म्हणा किंवा मग चपाती म्हणा. परदेशी मंडळी या पदार्थांना सरसकट Indian Bread म्हणून संबोधतात. थोडक्यात चपाती, पोळी आणि तत्सम पदार्थ आपल्या जेवणाच्या ताटात असले म्हणजे ते ताट परिपूर्ण वाटतं. किंबहुना ते शरीरासाठीही पूरक ठरतं.
गेल्या काही वर्षांमध्ये मात्र या चपातीबद्दलचे समज गैरसमज वेगवेगळ्या वाटांवर जाताना दिसत आहेत. कारण, अनेकांच्या मते गव्हाच्या पिठापासून तयार करण्यात येणाऱ्या चपातीमध्ये ग्लुटेन असल्यामुळं त्यावर फुली मारली जाते.
हे कितपत योग्य? चपाती खाणंच टाळण्यापेक्षा ती बनवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणं शरीरास फायद्याचं ठरतं आणि त्यामुळं पुरेशा पोषक तत्त्वांचा पुरवठाही केला जातो.
तुम्ही चपातीमध्ये काही पदार्थ मिसळून ती Detox म्हणून वापरू शकता. अशा चपातीमध्ये तंतूमय घटकांचा अर्थात फायबर्सचा भरणा असतो.
ही डिटॉक्स चपाती तयार करण्यासाठी पिठात दुधीच्या भाजीचा (दुधीचा कीस) कीस मिसळून कणिक व्यवस्थित मळून घ्या. दुधीमध्ये असणारा पाण्याचा अंश कणकेत शोषला जाऊन त्यातील पोषक तत्त्वं कणकेच्या गोळ्यात उतरतील.
चपातीच्या रुपात पोटामध्ये दुधी गेल्यामुळं यातील घटकांमुळं तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यात मदत होते. शिवाय दुधीमध्ये कॅलरी आणि फॅट नसल्यामुळं याचे शरीरावर विपरित परिणाम होत नाहीत.
तुम्ही चपातीचं पीठ मळायला देत असतानाच त्यामध्ये सोयाबिन, मका किंवा इतक धान्यही मिसळू शकता. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे असून, आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)