शिशुवर्गात जाण्यापासून ते आपल्याला कळायला लागेपर्यंत बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात, सांगितल्या जातात. याच गोष्टींचं आचरण आपण पुढील आयुष्यात करतो.
यातल्या काही गोष्टी आपल्या सवयीचा भाग होतात. त्याचाच एक भाग म्हणजे 'शू'ला आल्यास करंगळी दाखवणं.
यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते?
लहानपणापासूनच शाळेत शिकवलं जातं, की शू ला जायचं असल्यास हाताची करंगळी दाखवत समोरच्याला सूचित करायचं. शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल.
'शू'ला आल्यास हाताच्या करंगळीचा वापर करण्याचं नातं थेट पंचमहाभूतांशी जोडलं गेलं आहे. यामध्ये हाताचं सर्वात लहान बोट, म्हणजेच करंगळी ही 'जल' या घटकाचं प्रतीक आहे. हाताची करंगळी उंचावून साकारला जाणारा हा इशारा म्हणजे एका मुद्रेचाच भाग आहे. जल \ वरून मुद्रा असं या मुद्रेचं नाव.
मानवी शरीरात 60 ते 70 टक्के पाण्याचा अंश आहे. हा घटक शरीरातील द्रव्यांच्या हालचालीमध्ये प्रचंड महत्वाची भूमिका बजावतो. यामध्ये लाळ, स्पर्म, त्वचेतील आर्द्रता, डोळे, नाक आणि तोंडातील द्रव्याचा समावेश आहे. त्यामुळं या मुद्रेचे या घटकांना संतुलिक राखण्यासाठी अनेक फायदे आहेत.
योगसाधनेदरम्यान, आसनांचा अभ्यास झाल्यानंतर पाय एकमेकांवर ठेवून मांडी घाला. पाठीचा कणा ताठ ठेवा. आता अंगठा आणि करंगळी एकत्र आणत मधली तिन्ही बोटं सरळ ठेवा. हातांची ही अपेक्षित रचना झाल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटं याच मुद्रेत राहा. दर दिवशी शक्य असल्यास किमान 15 ते 20 मिनिटं या मुद्रेचा अभ्यास करा.