आजच महाराष्ट्रात मान्सूनने प्रवेश केला आहे. खरं तर पावसाळा हा ऋतू काही लोकांच्या आवडीचा असतो तर काहींना याचा त्रास होतो. पावसाळा जरी छान वाटत असला तरी पावसाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात साथीचे रोग होतात. त्यामुळेच आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेक आजार होऊ शकतात, त्यामुळे पाणी उकळून प्यावे. त्याचबरोबर पावसाळ्यात जास्त थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचे सेवन टाळावे.
दुध पचायला जड असतं. त्यातच पावसाळ्यामध्ये हलके आणि सहज पचतील असे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच पावसाळ्यात दुधामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. पर्याय म्हणून तुम्ही कॉटेज चीज, ताजे दही आणि ताक यांसारखे दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करु शकतो.
तज्ञांच्या मते जर तुम्हाला मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असेल, तर पावसाळ्यात त्यांचे सेवन टाळणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. मसालेदार पदार्थांमुळे त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता असते. विशेषतः पावसाळ्याच्या काळात हलके, सहज पचेल असे भोजन करावे.
पावसाळ्यात थंड वातावरणामुळे शरीरातील वाताचे प्रमाण वाढलेले दिसते त्यामुळे गरम पाण्यानेच आंघोळ करावी.
मांसाहारी पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे पावसळ्यात जास्त प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने आरोग्यासंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात. या ऋतूत मासे खाणे टाळावे. चिकन किंवा मटण याचे तंदूर प्रकार म्हणजेच भाजलेले मांस खावे.
ऋतूमानानुसार मिळणाऱ्या फळांचेच सेवन करावे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच पोषक तत्वं शरीरास फायदेशीर असतात.
पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. निरोगी आरोग्य हवे असेल तर बाहेरचे किंवा उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे, यामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.