बॉलिवूडवर (Bollywood) नेहमीच नेपोटिझमचा (Nepotism) आरोप करण्यात आला आहे. शाहरुख, अमिताभ, धर्मेंद्र, चंकी पांडे अशा अनेक अभिनेत्यांच्या मुलांना नेपोटिझमच्या टीकेला सामोरं जावं लागत असतं.
पण नेपोटिझम फक्त बॉलिवूडमध्येच आहे असं नाही. बॉलिवूडसह सर्वच चित्रपटसृष्टींमध्ये नेपोटिझम असून यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीही मागे नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तर अनेक कुटुंबांचा दबदबाच आहे. अनेक सुपरस्टार हे अशाच कुटुंबाचा भाग आहेत.
अल्लू अर्जूनचे आजोबा अल्लू रामलिंगेया हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठं आणि प्रसिद्ध नाव होतं. अल्लू अर्जूनचे वडील अल्लू अरविंद हेदखील एक प्रसिद्ध निर्माते आहेत. अल्लू अर्जूनसह त्याचा भाऊ अल्लू सिरीशही आता आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
राम चरणची आई अल्लू सुरेखा या अल्लू रामलिंगेया यांची मुलगी आहे. म्हणजेच अल्लू अर्जून आणि राम चरण हे मावस भाऊ आहेत. चिरंजीवीशिवाय त्यांचे दोन्ही भाऊ कल्याण आणि नागेंद्र मोठे सुपरस्टार आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी रजनीकांत यांचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे. एकीकडे रजनीकांत आपल्या चित्रपटांसह चाहत्यांच्या मनावर राज्य करत असताना दुसरीकडे त्यांच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्या दिग्दर्शन क्षेत्रात नाव कमावत आहेत. रजनीकांत यांचा जावई धनुषही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे.
चित्रपट निर्माते दग्गुबुती रामानायडू यांनी 1964 मध्ये सुरेश प्रोडक्शन सुरु केलं होतं. दग्गुबती कुटुंबात जन्मलेले व्यंकटेश दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत. तर राणा दग्गुबतीही या कुटुंबाचा भाग आहेत.
अक्किनेनी कुटुंब हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठ्या कुटुंबापैकी एक आहे. अक्किनेनी नागेश्वर राव दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते होते. त्यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा नागार्जुन यानेही चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं. आता नागार्जुन यांची मुलं नागा चैतन्य आणि अखिल अक्किनेनी हेदेखील आपले पाय रोवत आहेत.
कमल हासन हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एक मोठं नाव आहे. आता त्यांनी राजकारणातही प्रवेश केला आहे. त्यांच्या दोन मुली श्रुती हासन आणि अक्षरा हासन यादेखील आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावत आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नेपोटिजम असलं तरी त्यावर कोणी जाहीरपणे भाष्य करताना दिसत नाही