ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर लवकरच 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटात दिसणार आहेत. नाना पाटेकर आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेक गोष्टींवर त्याचं मत अगदी स्पष्ट आहे.
मीडियाशी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी बॉलिवूड चित्रपटांच्या कंटेंटवर भाष्य केलं. बॉलिवूमध्ये इतकी वर्षं काम केल्यानंतरही आपल्यात बनावटपणा का आलेला नाही याचं कारण त्यांनी सांगितलं.
नाना पाटेकरांनी सांगितलं की, त्यांचा मृत्यूवर विश्वास आहे. आपल्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडं हीच आपली संपत्ती आहे. त्याच्यासहच मी या जगाचा निरोप घेणार आहे.
"माझ्यासाठी लागणारी लाकडं मी जमा केली आहेत. ही सुकलेली लाकडं असून, त्याच्यावर मला जाळा. ओलं लाकूड वापरु नका, नाहीतर धूर होईल आणि जमलेल्यांच्या डोळ्यात जाईल व पाणी येईल".
"अशा स्थितीत पाहणाऱ्यांना ते माझ्यासाठी रडत आहेत असा गैरसमज होईल. किमान मरताना तरी गैरसमज ठेवू नका. उद्या तुमचा मृत्यू झाल्यानंतर 2-3 दिवसांनी कोणाच्या लक्षातही राहणार नाही," असं नाना पाटेकर म्हणाले.
नाना म्हणाले, मी तर सांगितलं आहे की माझा फोटोही लावू नका. मला पूर्णपणे विसरुन जा, हेच जास्त महत्त्वाचं आहे.
त्यांनी सांगितलं की, "आम्ही 7 भाऊ-बहिण होतो. ते सगळे गेले आणि आता मी एकटाच राहिलो आहे. आई-वडील, भाऊ-बहिण राहिले नसल्याने आता मी या जगाचा नाही. माझं जग तिथे दुसरीकडे आहे".
नाना पाटेकर यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.