वाढदिवशी काही नवे संकल्प ठरवले जातात. एका नव्या आयुष्याच्या दिशेनं वाटचाल करण्याची प्रतिज्ञा घेतली जाते. पण, या अभिनेत्यानं मात्र वेगळीच वाट निवडली.
Edoardo Santini नं 2019 मध्ये इटलीमध्ये Italy's most handsome man या स्पर्धेत सहभागी होत बाजी मारली होती. त्यानंतर त्यानं अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात करिअरही सुरु केलं.
आता मात्र त्यानं या क्षेत्रातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेत सर्वांनाच थक्क केलं आहे. वयाच्या 21 व्या वर्षी एडोआर्डोनं इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून अध्यात्मिक मार्गावरील नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याचं जाहीर केलं.
'मी इथून पुढं मॉडेलिंग, अभिनय आणि कलाक्षेत्रातील कारकिर्दीवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतो. पण, माझ्या आवडीनिवडीपासून मात्र मी दुरावलेलो नाही. मी फक्त त्या वेगळ्या मार्गांनी जगणार आहे. माझी कला देवासाठी सादर करणार आहे...', असं तो म्हणाला.
इथून पुढं तो कॅथलिक चर्चच्या माध्यमातून धर्मप्रसारकाचं काम करणार असून, नव्या धर्मप्रसारकांची नियुक्ती करण्याचं काम करणार आहे.
आपल्याला फार आधीपासूनच याबाबतची जाणीव झाली असून, मागच्याच वर्षी यासाठीचं पहिलं पाऊल उचललं असं त्यानं सांगितलं. येत्या काही दिवसांमध्ये त्यासंदर्भातलं संशोधन आपण सर्वांसमोर आणणार असल्याचंही Edoardo नं जाहीर केलं.
आपल्या आई- वडिलांच्या नात्याचा संदर्भ देत गेल्या काही दिवसांमध्ये अशा काही व्यक्तींची भेट घडली ज्यांच्यामुळं 'चर्च' ही एक संस्था म्हणून अधिक चांगल्या पद्धतीनं उमगू शकलं असं Edoardo सांगतो.