हौस भागवणं पडलं महागात; चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : हौसेला मोल नसतं असं म्हणतात. पण ती हौस पूर्ण करण्यासाठी माणसं कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. महागडी हौस भागवण्यासाठी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये (Nashik) घडला आहे.
घोडा (Horse)खरेदी करण्याची हौस भागवण्यासाठी नाशिकची दोन अल्पवयीन मुलांनी चक्क चोरीचा मार्ग निवडला होता. घोडा खरेदी करण्यासाठी या दोघांनी तब्बल १२ चोऱ्या केल्याचे पोलीस तपासामध्ये उघड झाले आहे.
दोन्ही अल्पवयीन मुलांनी मिळून आठ महागड्या सायकल, आठ मोटारसायकल आणि मोबाईल चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्यांमध्ये दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने तपासाकरिता विशेष पोलीस पथके नियुक्त करण्यात आली होती.
दुचाकी चोरीचा तपास करतानाच महागड्या सायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली. पोलिसांच्या पथकाने एका शाळकरी आणि एका शाळाबाह्य मुलाला ताब्यात घेतले.
चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांना घोडा खरेदी करण्याची हौस होती. मात्र त्यांच्या खिशात एक रुपयाही नव्हता. मग यासाठी पैसे जमा करण्याचे दोघांचे ठरले. त्यानंतर महागड्या सायकल चोरीचे खुळ त्यांच्या डोक्यात घुसलं. मग एक एक करत तब्बल आठ सायकली त्यांनी चोरल्या.
मात्र त्यांच्या सायकल चोरीचा पोलिसांना सुगावा लागला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असता, सायकली चोरल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून आठही सायकली विकण्यापूर्वीच जप्त केल्या असून, केवळ चुकीची मैत्री आणि अल्लडपणातून हे दोघे गुन्हेगारीकडे वळाल्याचे तपासात उघड झाले.
"मोटारसायकल, सायकल, मोबाईल आणि पर्स चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरी गेलेल्या आठ मोटारसाईकल, आठ साईकल, दोन मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. एकूण १२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे," अशी माहिती अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली
हौस भागवणं पडलं महागात; चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात